शासनव्यवहारात व्यापक वापर आवश्यक-आर. विमला

-मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त परिसंवाद

नागपूर दि,25: मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रसार अधिक परिणामकारक होण्यासाठी शासकीय व्यवहारात मराठीचा वापर वाढला पाहिजे. त्यासाठी या यंत्रणेतील सर्व घटकांनी जाणिवपूर्वक सोप्या आणि पर्यायी शब्दांचा अवलंब करावा. यासोबतच शासन व्यवहारातील मराठीचा वाढता वापर शासन आणि लोकांमधील अनुबंध अधिक दृढ करणारा ठरेल, असा आशावाद जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे व्यक्त केला.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, भाषा संचालनालय आणि विभागीय ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने विशेष परिसंवादाचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी श्रीमती विमला अध्यक्षीय समारोपात बोलत होत्या.

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख तथा प्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रमोद मुनघाटे, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. रविंद्र शोभणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक हेमराज बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.

      मराठी भाषेचे वैभव मोठे असून, विविध संत, तत्वज्ञ, विचारवंत, साहित्यिक यांनी तिच्या समृद्धी आणि संवर्धनासाठी अनन्यसाधारण असे योगदान दिले आहे. अनेक मान्यवरांनी तिच्याविषयीचा जाज्वल्य अभिमान वेळोवेळी जागविला आहे. मातृभाषेचा जाणिवपूर्वक केलेला वापर आस्था, अभिमान आणि आत्मविश्वासाची भावना जागी करतो. शासनव्यवहारात मराठीचा वापर सुलभरित्या करुन तो वाढविल्यास लोकांशी जोडले जाणे अधिक सुकर होईल. या उद्देशाने तिचा वापर निग्रहपूर्व‍क करावा. इतर भाषांचा काही ठिकाणी वापर करणे गरजेचे ठरत असले तरीही मराठीचा आग्रह असायलाच हवा, असेही श्रीमती विमला यांनी आवर्जून सांगितले.

 मराठी ही ज्ञानभाषा म्हणून विकसित असताना तिचा लोकभाषा म्हणून अधिक प्रसार झाला पाहिजे, असे सांगून डॉ. प्रमोद मुनघाटे यावेळी म्हणाले, नागरिकांचा प्रशासनाशी विविध पातळ्यांवर दैनंदिन संबंध येतो. त्यांच्या समस्या आणि प्रश्न हे शासनदरबारी मराठी भाषेतून अधिक व्यापकपणे मांडले गेले पाहिजेत. मराठीच्या संवर्धनासाठी राज्याच्या निर्मितीपासून प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी प्रशासनातील सर्वांनी कृतिशील राहून मातृभाषेबद्दलची निष्ठा जोपासावी. विविध प्रशासकीय बाबी हाताळताना सोप्या, सर्वसामान्यांना समजणाऱ्या शब्दांचा वापर व्हायला हवा. जैवविविधतेप्रमाणेच मराठीची जैवविविधता जपली गेली पाहिजे. प्रशासनात नवीन परिभाषा, संज्ञानिर्मिती करण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर जाणिवपूर्वक प्रयत्न होतानाच जनसामान्यांना समजेल अशा पद्धतीने पर्यायी शब्दांचा वापर वाढविण्याची आवश्यकता व्यक्त करताना डॉ. रविंद्र शोभणे म्हणाले की, नव्या पिढीमध्ये मराठी भाषा आणि तिच्याविषयीची आस्था  रुजविण्यासाठी प्राथमिक स्तरापासूनच उपक्रम राबविले गेले पाहिजे. मराठी भाषेतील संचित खूप मोठे आहे. त्याचा सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक विकासासाठी प्रभावीपणे वापर झाला पाहिजे. मराठी भाषा संवर्धनाचा विचार करताना मराठी माध्यमातील शाळांची संख्या दरवर्षी वाढली पाहिजे, तरच भविष्यात मराठी अधिक समृद्ध  होऊ शकेल.

      प्रशासकीय व्यवहारातील मराठी सोपी आणि सुटसुटीत करण्यासाठी निरंतर प्रयत्न गरजेचे असल्याचे स्पष्ट करताना श्री. योगेश कुंभेजकर म्हणाले प्रशासकीय कार्यपद्धतीतील भाषाविषयक क्लिष्टता टाळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. इतर भाषांतील शब्दातील समावेशाने मराठी समृद्ध होत आहे. मात्र तिचा मूळ गाभा जोपासला गेला पाहिजे. त्यादृष्टीनेही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आग्रही असले पाहिजे. मराठी भाषा संवर्धनाचे  प्रयत्न अधिक परिपूर्ण होण्यासाठी लोकप्रिय माध्यमांचा प्रभावी वापर झाल्यास कोणत्याही प्रतिकुलतेला मराठी यशस्वीपणे तोंड देऊ शकेल, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माहिती संचालक हेमराज बागुल यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. शासन व्यवहारातील मराठी भाषेचा वाढता वापर या यंत्रणेला लोकांशी जोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे सांगताना  इतर भाषेतील शब्दांच्या वापराबाबत समतोल राखून मराठीचे सत्व आणि स्वत्व जोपासावे, असे प्रतिपादित केले.

      प्रारंभी परिसंवादाचे उद्धाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. पाहुण्यांचा परिचय सहायक संचालक हरेश सूर्यवंशी यांनी केला तर कार्यक्रमाचे संचालन विशेष समन्वय अधिकारी अनिल गडेकर यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी मानले.  यावेळी उपायुक्त आशा पठाण, अंकुश केदार, धनंजय सुटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, विभागीय ग्रंथपाल विभा डांगे, श्रीमती कांबळे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कॅरॅव्हॅन हेरिटेज अँड ऍग्रोटुरिझम टूर ची सांगता राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने अभिनव संकल्पना

Tue Jan 25 , 2022
नागपूर, दि.25 : आज पर्यटन संचालनालयाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयाने राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा केला. या दिनाचे यावर्षीचे घोषवाक्य “ग्रामीण आणि समुदाय पर्यटन” असे असल्याने त्यानुरूप, रामटेक तालुक्यातील काही वारसा स्थळे व कृषी पर्यटन स्थळांचा कॅरॅव्हॅन या विशिष्ट वाहनातून दौरा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी आर विमला यांच्या प्रमुख उपस्थितीत या कॅरॅव्हॅन हेरिटेज टूर चा प्रारंभ झाला. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच कॅरॅव्हॅन पर्यटनास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com