आंबेडकरी चळवळीतील खऱ्या नायकांचा इतिहास नव्या पिढीसमोर उजागर करा -डॉ. पुरणचंद्र मेश्राम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मदीक्षा देऊन लक्षावधी लोकांना हजारो वर्षांच्या धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे हा दिवस आमच्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक स्वातंत्र्यदिन असून ही धम्मक्रांती यशस्वी करणारे कार्यकर्ते हे सर्वंकष मानवमुक्ती लढ्याचे  स्वातंत्र्ययोद्धे आहेत.चळवळीसंबंधी उदासीन असलेल्या नव्या पिढीला आंदोलनात कृतिप्रणव  करण्यासाठी त्यांच्यापुढे आंबेडकरी चळवळीतील अशा खऱ्या  नायकांचा इतिहास  उजागर  करणे काळाची अपरिहार्यता आहे, असे प्रतिपादन नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव व आंबेडकरी प्रवक्ते डॉ. पुरणचंंद्र मेश्राम यांनी केले.

कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानद्वारा डॉ आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘डॉ  बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीचे योद्धे’ या विषयावर आयोजित परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. नागपूरातील ऐतिहासिक धम्मदीक्षा समारोहात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले व डॉ. आंबेडकरांच्या सहवासात राहिलेले तत्कालीन नगरसेवक  दिवंगत नेते आकांत माटे यांच्या तिसाव्या स्मृतिदिनानिमित्त हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर हरदास आवळे बाबू प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम गायकवाड होते.

डॉ.मेश्राम पुढे म्हणाले की, नवी पिढी चळवळीत का उतरत नाही यांच स्वचिंतन करण्याची गरज आहे. नव्या प्रतिक्रांतीचा उदय होत असून याविरुद्ध लढा उभारण्यासाठी येणाऱ्या पिढीला घडवून त्यांना युद्धसज्ज करणे ही आपल्या पिढीची नैतिक जबाबदारी आहे. या दृष्टीने सर्वांनी कृतिशील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रस्तुत परिसंवादात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे माजी सहसंचालक डॉ.बी.जी. वाघमारे, ॲड. व्ही. पी. बोरकर, डॉ. संजय गजभिये, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव जामगडे यांनीसुद्धा धम्मसोहळा यशस्वी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकला.

अध्यक्षीय भाषणात दिवंगत आकांत माटे यांचा कार्यगौरव करताना  पुरुषोत्तम गायकवाड  म्हणाले की, आंकात माटे यांनी धम्मदीक्षा समारोह आयोजनासाठी दक्षिण नागपूर परिसरातील स्वतः च्या मालकीची ५ एकर जागा दान देण्याचा प्रस्ताव बाबासाहेब आंबेडकरांपुढे ठेवला होता.त्यांच्या औदार्यवृत्तीचे डॉ. आंबेडकरांनी कौतुक केले होते.धममदीक्षा घेतल्यावर बौद्ध झाल्याने त्यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव पदावर निवडून आलेल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा बाणेदारपणा दाखविला होता.असे आदर्श कार्यकर्ते समाजात घडविण्यासाठी पुढाकार  घेणे गरजेचे आहे. याप्रसंगी दिवंगत  आकांत माटे यांच्या कन्या पद्मा फुलझेले यांनीही आकांत माटे यांच्या  डॉ. आंबेडकरांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. या प्रसंगी  आकांत माटे यांचे सुपुत्र इंजिनियर मदन माटे यांचा सत्कार करण्यात आला.

परिसंवादाचे प्रास्ताविक नानाजी गायकवाड यांनी केले, संचालन डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार हरीश जानोरकर यांनी मानले.

परिसंवादाला आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कर्मवीर हरिदास आवळे बाबू प्रतिष्ठानचे दादाजी अंबादे, हरीश जानोरकर,मदन माटे,  रामभाऊ बागडे, शैलेश आंबूलकर, राजकुमार मेश्राम इत्यादींनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गणेशमंडळांनी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभाग घ्यावा - सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगंटीवार

Wed Aug 30 , 2023
– 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई :- गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिनस्थ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे सन २०२२ पासून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा सुरु करण्यात आली. यावर्षी आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशमंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. या स्पर्धेची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संकेतस्थळावर देण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!