नवी दिल्ली येथील कार्यक्रमात चार शहरांचा सन्मान
नागपूर :- स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’मध्ये नागपूर विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली असून विभागातील चार शहरांचा नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विभागातील 19 शहरांना ‘थ्री स्टार’ कचरामुक्त शहर, बारा शहरांना ‘वन स्टार’ कचरामुक्त शहराचा दर्जा मिळाला आहे. विभागातील सर्वाधिक 37 शहरांना ओडीएफ प्लस प्लस, तर 19 शहरांना ओडीएफ प्लस दर्जा मिळाला.
पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्येच्या स्वच्छ शहर नागरिकांच्या अभिप्राय श्रेणीत गडचिरोली शहराने तर पंधरा हजारापेक्षा कमी लोकसंख्येच्या श्रेणीत सेलू शहराने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. विभागातील शाश्वत स्वच्छता शहर म्हणून नरखेड तर स्वच्छतेसाठी नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या कुरखेडा शहराला पुरस्कार प्राप्त झाला असून याचे वितरण नवी दिल्ली येथील कार्यक्रमात मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते झाले.
‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’मध्ये देशातील 4 हजार 354 शहरांचा अभ्यास करण्यात आला. यात 62 कटक मंडळांचा समावेश होता. केंद्र शासनाने नुकतीच स्वच्छ भारत अभियानाची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये नागपूर विभागाने नागरी स्वच्छता अभियानातील कामगिरीत सातत्य ठेवत यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये घोडदौड कायम राखली आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानात (नागरी) नागपूर विभागाने गेल्या तीन वर्षांपासून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ कालावधीत तत्कालीन विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विद्यमान विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, उपायुक्त संघमित्रा ढोके सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतीला भेटी देवून मार्गदर्शन केले. तसेच संबंधित जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यशाळा, बैठका घेवून मार्गदर्शन केले. विभागीय तांत्रिक तज्ज्ञ पंकज कटारिया, अभिषेक रेवतकर, मीनाक्षी बागडे आणि अभिलाष अलोणी यांनी स्थानिक स्तरावर येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवून अभियानासाठी आवश्यक तयारीला मदत केली.