– दोन हजार २९७ रूग्णांवर सावंगी मेघे येथे उपचार होणार
यवतमाळ :- जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त दिग्रस, दारव्हा, नेर येथे आरोग्य संकल्प अभियानांतर्गत माँ आरोग्य सेवा समिती यवतमाळ व दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात तिन्ही तालुक्यांत एकूण पाच हजार ४६० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यातील गंभीर आजार असलेल्या दोन हजार २९७ रूग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी (मेघे) येथे दाखल करण्यात येणार आहे.
शासकीय रूग्णालयात अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात. मात्र कर्करोग, किडनी, मेंदूविकार व इतर गंभीर आजारांवरील उपचार महागडे व खर्चिक असतात. मतदारसंघातील नागरिकांचा अशा महागड्या आजारांवरील उपचारासाठी एक रूपयासुद्धा खर्च होवू नये. त्यांच्यावर सर्व उपचार मोफतच व्हावे, यासाठी दर सहा महिन्यांनी दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्फत नियमित आरोग्य तपासणी शिबीर घेतले जाते. आरोग्य संकल्प अभियानांतर्गत दिग्रस येथे ९ जून, नेर येथे १५ जून व दारव्हा येथे २२ जून रोजी हे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषध वितरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तिन्ही तालुक्यांत नेत्ररोग विभागात एक हजार ५२४, मेडिसिन (७०६), बालरोग (१७३), शल्यचिकित्सा (५८२), स्त्रीरोग (२७९), अस्थिरोग (८९६), कान, नाक, घसा (२७६), त्वचारोग (१४७), श्वसनरोग (२१५), दंत व मुख रोग (७८), मानसिक विकार (११८), हृदयरोग (९७), मुत्ररोग (५९), मेंदूविकार (८०), न्युरोसर्जरी (९५), प्लास्टिक सर्जरी (३), रेडिओलॉजि (१०), आयुर्वेद (९३) आणि कर्करोग विभागात २९ रूग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. याशिबिरात दिग्रस तालुक्यात दोन हजार १५०, नेर एक हजार ५२० तर दारव्हा तालुक्यात एक हजार ७९० अशा पाच हजार ४६० रूग्णांनी लाभ घेतला. या रूग्णांमधून दोन हजार २९७ रूग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी मेघे येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. त्यात नेत्ररोग विभागातील ८२७, मेडिसिन (२६७), बालरोग (३९), शल्यचिकित्सा (२३९), स्त्रीरोग (१३९), अस्थिरोग (३५१), कान, नाक, घसा (१९४), त्वचारोग (१५), श्वसनरोग (३२), दंत व मुख रोग (१५), मानसिक विकार (२६), हृदयरोग (१५), मुत्ररोग (४०), मेंदूविकार (१९), न्युरोसर्जरी (१५), प्लास्टिक सर्जरी (१), रेडिओलॉजि (३), आयुर्वेद (५५) आणि कर्करोग विभागातील पाच रूग्णांचा समावेश आहे.
या रूग्णांना दिग्रस, नेर, दारव्हा येथून पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयातून पुढील मोफत उपचारासाठी सावंगी मेघे येथे नेले जाणार आहे. या सर्व रूग्णांवर पुढील उपचार मोफत केले जाणार आहेत. ज्या आजारांवर शासकीय योजनांमधून उपचार शक्य नाही, त्या उपचारांसाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात मॉं आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाणार आहे. गंभीर आजारांवरील महागडे उपचार, रूग्णांच्या विविध रक्त तपासण्या, औषधी व सर्व रूग्णांसह त्यांच्या एका नातेवाईकाचा येण्या – जाण्याचा व जेवणाचा सर्व खर्च पालकमंत्री संजय राठोड करणार आहेत.
सावंगी मेघे येथे उपचारासाठी जाणाऱ्या रूग्णांची कोणतीही गैरसोय होवू नये यासाठी ना. संजय राठोड यांनी यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात ठेवलेल्या रूग्णसवेकांप्रमाणेच सावंगी मेघे येथील दवाखान्यात रूग्णसेवक नेमले आहेत. हे रूग्णसेवक दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील शिबिरांमधून उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना सर्व सेवा पुरवतात. त्यांच्या विविध तपासण्या, औषधी, राहण्याची, जेवणाची व्यवस्था करून देण्यासाठी हे रूग्णसेवक मदत करतात. गंभीर आजारांवरील उपचारांचा खर्च पालकमंत्री संजय राठोड हे वैयक्तिकपणे करत असल्याने दिग्रस मतदारसंघातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यात नियमित होणाऱ्या या आरोग्य शिबिरांमुळे विविध आजारांचे रूग्ण घटत असल्याचे दिसून येत असल्याचा अनुभव या शिबिरात कार्यरत डॉक्टरांनी सांगितला.