– नागरिकांवर सर्व उपचार मोफत व्हावे हाच प्रयत्न – ना. संजय राठोड
दारव्हा :- शासकीय रूग्णालयात अनेक आजारांवर मोफत उपचार होतात. मात्र कर्करोग, किडनी, मेंदूविकार अशा आजारांवरील उपचार महागडे व खर्चिक आहेत. मतदारसंघातील नागरिकांचा अशा महागड्या आजारांवरील उपचारासाठी एक रूपयासुद्धा खर्च होवू नये. त्यांच्यावर सर्व उपचार मोफतच व्हावे, यासाठी आपण प्रयत्नशील असतो. त्यामुळेच दर तीन महिन्यांनी तालुक्यात आरोग्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेतले जाते, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
माँ आरोग्य सेवा समिती यवतमाळ व दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य संकल्प अभियानांतर्गत दारव्हा येथील नगर परिषद शाळेत आज शनिवारी आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ना. संजय राठोड बोलत होते. यावेळी पराग पिंगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, तालुकाप्रमुख मनोज सिंगी, माजी नगराध्यक्ष बबनराव इरवे, कृउबा सभापती सुभाष राठोड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संजय राठोड म्हणाले, रूग्णसेवा हिच ईश्वरसेवा मानून गेल्या २६ वर्षांपासून आपण काम करत आहो. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची रूग्णालयात गैरसोय होवू नये, यासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजही आपले कार्यकर्ते पूर्णवेळ कार्यरत आहेत. आपल्या मतदारसंघातील नागरिकांना उपचारांसाठी कुठेही जायला लागू नये, यासाठी दर तीन महिन्यांनी या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. येथे तपासणी करून गंभीर आजाराचे रूग्ण आढळल्यास त्यांना सावंगी (मेघे), मुंबई, नागपूर आदी ठिकाणी पुढील उपचारांसाठी पाठवले जाते. सर्व उपचार शासकीय योजनांमधून केले जातात. जे उपचार योजनेतून शक्य नाही, त्या उपचारांसाठी मॉं आरोग्य सेवा समितीच्या माध्यमातून मदत केली जाते, असे ते म्हणाले. हे शिबीर कोण्या एका समुदायासाठी नसून सर्व जाती, धर्मातील नागरिकांसाठी असल्याचे यावेळी बोलताना संजय राठोड यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात दिग्रस, नेर येथे झालेल्या शिबिरात चार हजारांवर रूग्णांनी लाभ घेतला. आज दारव्हा येथे झालेल्या शिबिरात १ हजार ७९० रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील गंभीर आजार असलेल्या रूग्णांना सावंगी मेघे येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. आजच्या शिबिरात सावंगी मेघे, यवतमाळ आदी ठिकाणाहून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मेडीसिन, हृदयरोग, नेत्ररोग, सर्जरी, स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचारोग, बालरोग, कान, नाक, घसा, श्वसनरोग, मानसिक विकार, मेंदूविकार, स्त्रीरोग, दंत व मुखरोग, युरो (किडनी), कर्करोग, मूत्ररोग, पोटविकार रूग्णांची तपासणी करून उपचार केले व रूग्णांना शिबिरातच औषधींचे मोफत वाटप करण्यात आले.
पावसाळी वातावरण असतानाही शिबिरात नागरिकांनी गर्दी केली होती. येणारे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी शिबिरस्थळी भोजन, पाणी आदी व्यवस्था करण्यात आली होती. शिबरात राजू दुधे, सुशांत इंगोले, योगेश गवळी, एस.पी. राठोड, नामदेव जाधव, रमेश जाधव, गोपाल खाडे, एकनाथ माहुरकर, संदीप राठोड, प्रवीण भगत, प्रमोद यंगड, प्रकाश राठोड, सविता जाधव, मंगला निंबेकर, सुरेखा राठोड, शीतल राठोड, साधना थेर, रमेश राठोड, लाला गिरी, प्रकाश दुधे, धनराज राठोड, माणिकचंद काकरिया, रवी वांड्रसवार, प्रेमसिंग चव्हाण, गणेश दुबे, प्रकाश राऊत, जवळकर आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.