संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणाऱ्या तालुका दर्जा प्राप्त कामठी शहरातील नागरिकांवर स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या वतीने मालमत्ता करात नियमबाह्य पद्धतीने अवाढव्य करवाढ करण्यात आली आहे. या करवाढीच्या विरोधात कामठी नगर परिषद प्रशासनाला विचारणा केली असता यावर कुठलाही तोडगा काढण्याच्या मानसिकतेत मुख्याधिकारी नसल्याचे दिसून येते. तेव्हा न्यायिक भावनेतून नागरी हितार्थ आपले मतभेद बाजूला सारून सर्व राजकीय , सामाजिक, नेतेमंडळीं, कार्यकर्ते तसेच जागरूक नागरिकांनी सर्वदलिय पक्षाच्या वतीने 12 नोव्हेंबर ला पुकारण्यात आलेल्या कामठी बंद आंदोलनात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे पदाधिकारी व कामठी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष अजय कदम यांनी केले आहे.