नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी (ता.१०) उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनेसंदर्भात वैद्यकीय अधिकारी, झोनल वैद्यकीय अधिका-यांची कार्यशाळा घेण्यात आली. महाल येथील राजे रघुजी भोसले नगरभवन (टाउन हॉल) येथे झालेल्या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम, डॉ. रवींद्र सावरकर, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे, डॉ. सुरेश मोटे आदी उपस्थित होते.कार्यशाळेमध्ये उष्माघात प्रतिबंधासाठी शासद्वारे प्राप्त निर्देशाच्या अनुषंगाने काटेकोर अंमलबजावणीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. मनपाद्वारे उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना कशी राबविण्यात येईल, याबाबत डॉ. गोवर्धन नवखरे यांनी माहिती दिली. तर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम यांनी वातावरणातील बदल आणि उष्माघात या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. रवींद्र सावरकर यांनी उष्माघाताची लक्षणे व उपचार याविषयाला अधोरेखित केले. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी उपाययोजनांच्या संदर्भात प्रकाश टाकला.
कार्यशाळेचे संचालन मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा उष्माघात प्रतिबंधक आराखडाचे नोडल अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी केले. आभार दिपाली नागरे यांनी मानले. कार्यशाळेत मनपाचे वैद्यकीय अधिकारी, झोनल वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित वैद्यकीय अधिकारी त्यांच्या अधिनस्त कर्मचा-यांना उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रशिक्षण देउन पुढील कार्यवाही करतील