राज्यसरकारच्या या हुकुमशाही कृतीचा जयंत पाटील यांनी केला निषेध…
नागपूर :- मला निलंबित केलात तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार असल्याचे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यसरकारच्या या हुकुमशाही कृतीचा निषेध केला.
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधकांचा वारंवार आवाज दाबण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून होत आहे. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची जसे की छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांची बदनामी, राज्यातील तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवर अजिबात चर्चा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
दिशाभूल करणारे विषय सभागृहात उपस्थित करून सभागृहाचा मौल्यवान वेळ सत्ताधारी पक्षातील आमदार वाया घालवत होते. विरोधकांना बोलण्याची संधीच दिली जात नव्हती, तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेले बेकायदेशीर भूखंड वाटप व गैरव्यवहाराबद्दल आम्ही उपस्थित करत असलेली चर्चा टाळण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न होत होता. म्हणूनच मी सदनात उभे राहून ‘असा निर्लज्जपणा करू नका’ असे शिंदे – फडणवीस सरकारला उद्देशून म्हणालो असे स्पष्ट करतानाच विरोधकांचा आवाज दाबण्याच्या आणि विरोधकांवर वचक बसवण्याच्या उद्देशाने सरकारने मी असे विधान अध्यक्षांना उद्देशून बोलल्याचा बनाव केला व मला हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.