नागपूर :-नागपूर जिल्हा महानगरपालिका कामगार युनियनची स्थापना करण्यात आली असून कामगार आयुक्तांकडे त्याची रितसर नोंदणी करण्यात आली आहे. त्याचा नोंदणी क्र. एन. जी. पी. 5803 असा असून माजी नगरसेवक ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या पुढाकारातून या युनियनची स्थापणा करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित कार्यकारिणीची पहिली बैठक नुकतीच संपन्न झाली. ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या हिवरी नगर, रमाई आंबेडकर मार्गावरील जनसंपर्क कार्यालयात ॲड. राहुल झांबरे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडली.
बैठकीत संघटनेचे नवनियुक्त सचिव लोकेश मेश्राम व अन्य पदाधिकारी रोशन बारमासे, मनीष मेश्राम, कैलाश बनदुधे, दिप्ताजय बोरकर, राहुल पांडव, आशिष पाटील, मंगेश गोस्वामी, सोनम बागडे, खिलावन लांजेवार, शंकरराव मेश्राम आदींची उपस्थिती होती.
संघटनेच्या बैठकीत डीसीपीएस योजना अंतर्गत असलेल्या कर्मचारी निधीचे हिशेब, दैनंदिन भत्ता आणि सातवा वेतन आयोगाची थकबाकी, अधिसंख्य पदावर कर्मचा-यांना लाड पागे समितीच्या शिफारशी नुसार लागू करणे, अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश, मनपा सेवेत २० वर्षे पूर्ण झालेल्या पण ऐवजी कार्ड नसलेल्या ऐवजदारांना स्थायी नियुक्ती देतांना जाचक अटी शिथील करणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
सध्या ११ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून लवकरच कार्यकारिणी विस्तारित करण्यात येईल, मनपातील सर्व सभासद कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात येऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन व न्यायालयीन लढा उभारण्यात येण्याचे धर्मपाल मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.