Ø योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा
Ø योजनेंतर्गत जास्तीत जास्त नोंदणीचे आवाहन
यवतमाळ :- युवकांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत युवकांना प्रशिक्षण व उद्योजक, शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आस्थापनांनी या योजनेंतर्गत जास्तीत जास्त नोंदणी करून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक संचालक विद्या शितोळे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, उद्योगांचे संचालक, बँक अधिकारी उपस्थित होते.
योजनेसाठी उद्योजक, शासकीय, निमशासकीय आस्थापनांना नोंदणी करून आपल्याकडे रिक्त असलेल्या पदांच्या तुलनेत प्रशिक्षणार्थी मनुष्यबळाची मागणी संकेतस्थळावर करावयाची आहे. सर्व उद्योग व आस्थापनांनी नोंदणी करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. युवकांना उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
या योजनेचा लाभ 12 वी, आयटीआय, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण करणारे रोजगार ईच्छूक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करून घेऊ शकतात. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, विविध आस्थापना यांनी आवश्यक असलेली मागणी ऑनलाईन नोंदविल्यास त्यांना प्रशिक्षणार्थी उमेदवार उपलब्ध करून दिले जातील. प्रशिक्षण कालावधी 6 महिने ईतका राहणार आहे.
यासाठी आस्थापना, उद्योग नोंदणीकृत व राज्यात कार्यरत असावा तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यात विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अशा आस्थापनांना त्यांना आवश्यक आणि प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना त्यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उमेदवारांना आस्थापना, उद्योजकांकडे प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असतांना सहा महिन्याच्या कालावधीसाठी त्यांना विद्यावेतन देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणार्थी उमेदवाराचे वय 18 ते 35 च्या दरम्यान असावे. किमान शैक्षणिक पात्रता 12 वी, आयटीआय, पदविका, पदविधर, पदव्युत्तर असावी. महाराष्ट्राचा रहिवासी व आधार नोंदणी आवश्यक आहे. विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी, आधारकार्ड बॅंक खात्याशी संलग्न असावे. योजनेंतर्गत 12 वी पास उमेदवारांना सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत 6 हजार, आयटीआय, पदविका उमेदवारास 8 हजार तर पदवीधर, पदव्युत्तर उमेदवारास दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे.
उद्योजकांनी नोंदणी करण्यासोबतच सर्व शासकीय कार्यालयांनी येत्या सोमवार पर्यंत आपल्याकडीने रिक्त पदांच्या तुलनेत आवश्यक प्रशिक्षणार्थींची मागणी ऑनलाईन नोंदवावी. ग्रामपंचायतींना सुद्धा प्रत्येकी 1 प्रशिक्षणार्थी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नोंदणीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. सुरवातीस सहाय्यक संचालक विद्या शितोळे यांनी उपस्थित सर्वांना योजना व योजनेची कार्यपद्धती याबाबत माहिती दिली.