एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फुटबॉल करंडक स्पर्धेचे उद्घाटन
मुंबई : जर्मनीतील एफ. सी. बायर्न म्युनिक क्लब यांच्याशी झालेल्या सामंजस्य करारानुसार आजपासून राज्यात एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फुटबॉल करंडक स्पर्धा सुरु झाली. जगात सर्वाधिक प्रमाणात खेळला जाणारा खेळ फुटबॉल असून राज्यात फुटबॉल खेळाचे प्रमाण वाढवून आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू तयार होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
कुपरेज येथील मैदानात मुंबई शहर अंतर्गत एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फुटबॉल करंडक स्पर्धेचे उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एफ. सी. बायर्न म्युनिक फुटबॉल क्लबचे व्यवस्थापकीय संचालक मॅक्सिमिलन हशके उपस्थित होते.
क्रीडा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, एफ. सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल आजपासून तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धा सुरू होत असून राज्यातील एक लाख विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातून २० विद्यार्थी निवडले जाणार आहेत. या खेळाडूंना एफ. सी. बायर्न क्लब च्या माध्यमातून जर्मनीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
पारंपरिक पद्धतीने खेळाला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदके मिळण्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.एफ. सी. बायर्न फुटबॉल क्लब म्युनिच जगातील नामांकित संस्था असून प्रशिक्षक, खेळाडू, कर्मचारी यांच्यासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार करून राज्यातील फुटबॉलच्या वाढीस मदत होणार आहे.
राज्यातील २० प्रतिभावंत खेळाडू निवडीसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेळाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आपण चांगला खेळ खेळावा आणि या वीस जणांच्या यादीमध्ये आपलं नाव असावे. खेळाडूंकडून त्यांनी स्पर्धेचे घोषवाक्य ‘चलो खेलो फुटबॉल’ असे आहे, असेही त्यांनी सांगितले.