स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढविण्यावर भर; भाडेतत्वावरील जागांसाठी दुपटीने भाडेवाढ – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- शासनाच्या स्व-मालकीच्या जागेतील अंगणवाड्यांमधून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्या स्मार्ट करण्याची योजना सुरू आहे. याअंतर्गत मागील तीन वर्षात 16,885 अंगणवाडी केंद्रांचे स्मार्ट अंगणवाडी केंद्रांमध्ये रुपांतर झाले असून याची गती वाढविण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली जाणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत सांगितले. भाडेतत्वावरील अंगणवाड्यांसाठीच्या भाड्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली असून अधिकची वाढ करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील अंगणवाड्यांबाबत सदस्य भाई गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह सदस्य सर्वश्री सत्यजित तांबे, ज्ञानेश्वर म्हात्रे, गोपीचंद पडळकर, जयंत पाटील, सुनील शिंदे आदींनी भाग घेतला.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्यात 1 लाख 10 हजार 556 अंगणवाडी केंद्र आहेत. यापैकी 72,379 केंद्र स्वमालकीच्या जागेत आहेत. ज्या केंद्रांना स्वमालकीची जागा नाही तेथे जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. जेथे अंगणवाडी केंद्र नाहीत अशा 8084 नवीन अंगणवाडी केंद्रांचे प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज उपलब्ध होत नाही अथवा वीज खंडित होते त्याठिकाणी सोलरच्या माध्यमातून ही अडचण दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील झोपडपट्टीमध्ये 5147 अंगणवाडी केंद्र आहेत. महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण अंगणवाडी केंद्रांपैकी 20 ते 25 टक्के केंद्र महिला व बालविकास विभागांतर्गत आहेत. इतर केंद्र महानगरपालिकेमार्फत सुरू आहेत. अंगणवाडी केंद्राचा सर्व मुलांना लाभ व्हावा यासाठी शासन आणि महानगरपालिकेमार्फत एकत्रित प्रयत्न करण्यात येतील. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नसेल अशा ठिकाणी सुविधा असलेल्या कंटेनरमध्ये अंगणवाडी सुरू करण्याचे धोरण आहे. एसआरएमधील जागा उपलब्ध होण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील भाडेतत्वावरील अंगणवाडी केंद्रांच्या भाड्याच्या रकमेत चार हजार वरून आठ हजार, अ वर्ग नगरपालिका क्षेत्रात तीन वरून सहा हजार, तर ग्रामीण भागातही भाड्याच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली असल्याचे मंत्री तटकरे यांनी सांगितले.

अंगणवाडी केंद्राच्या जागेत स्वच्छता असावी, तसेच भाड्याच्या जागेसाठी रेडीरेकनर प्रमाणे भाडे द्यावे, अशी सूचना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पाणीपुरवठ्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Tue Jul 9 , 2024
मुंबई :- केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन आणि हर घर जल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घराला पाणी पुरवठ्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वास पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत बोलताना व्यक्त केला. सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी पालघर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राम शिंदे, गोपीचंद पडळकर, सत्यजित तांबे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com