नागपूर : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट या भारतातील मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांची एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच एपीएफएचआरएम (APFHRM) च्या संचालक मंडळावर निवड करण्यात आली आहे.
श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या संस्थेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्ल्ड फेडरेशन ऑफ पीपल मॅनेजमेंट असोसिएशन (डब्ल्यूएफपीएमए) या जागतिक स्तरावरील मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या संघटनेशी एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट (एपीएफएचआरएम) संलग्न आहे.
औद्योगिक आस्थापनांमधील मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनेत भारतासह श्रीलंका, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनिआ, फिजी, हाँगकाँग, जपान, तैवान, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव आणि युएई (दुबई) या अठरा देशांचा या आंतरराष्ट्रीय संघटनेत समावेश आहे.
या देशांमधील विविध औद्योगिक कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापकांचे प्रश्न सामूहिक प्रयत्नातुन सोडवणे, त्यांच्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करणे, विविध देशांमधील व्यवस्थापन कार्यशैलीच्या माहितीचे आदान – प्रदान करणे, व्यवस्थापन क्षेत्राविषयीची संशोधन पत्रिका प्रकाशित करणे अशा विविध स्तरावर एपीएफएचआरएमचे कार्य चालते.
या संघटनेच्या संचालक मंडळावर निवड झालेले विश्वेश कुलकर्णी हे गेल्या ३९ वर्षांपासून मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असून ते राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवित असलेल्या एनआयपीएम संस्थेत भारतातील विविध औद्योगिक कंपन्यांचे ४० हजारहून अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक सभासद आहेत. याशिवाय कौशल्य विकास प्रशिक्षणात देशात अग्रेसर असलेल्या ‘यशस्वी’संस्थेचे कुलकर्णी हे स्थापक आहेत.
एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच एपीएफएचआरएम या संस्थेचे कामकाज येत्या एक एप्रिल २०२३ पासून भारतातून कार्यान्वित करण्यात येईल असाही निर्णय श्रीलंका येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आत्तापर्यन्त ऑस्ट्रेलिया व हाँगकाँग या दोन देशातूनच संस्थेचा कार्यभार चालविण्यात येत असे.
संस्थेच्या संचालक मंडळावर निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया देताना विश्वेश कुलकर्णी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व व नेतृत्त्व करण्याची मिळालेली ही संधी खूप महत्वाची असून पुढील काळात या क्षेत्रात सर्वसमावेशक धोरणाचा अंगीकार करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.