– दिव्यांग मतदार घरूनच नोंदवू शकतील सुविधांची मागणी
यवतमाळ :- दिव्यांग मतदारांना मतदान करतांना सुविधा उपलब्ध व्हावी, त्यांना रांगेत उभे रहावे लागू नये तसेच या मतदारांचे शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सक्षम ॲप’ निर्माण केले असून दिव्यांग मतदारांनी या ॲपचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघातील दिव्यांग मतदारांची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दिव्यांग व्यक्तींना रांगेत प्रतिक्षेत न राहता मतदान करता यावे यासाठी त्यांना प्राधान्य दिले जाते. मतदान केंद्रावर कायमस्वरुपी किंवा संपूर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने निवडणुक आयोगाने सक्षप ॲप निर्माण केले आहे. या ॲपमध्ये नवीन दिव्यांग मतदार नोंदणी, दिव्यांग मतदार नोंदणी फॉर्म मधील दुरुस्ती, मतदाराचे स्थलांतरणाची नोंदणी, नोंदणी रद्द करणे तसेच आधारक्रमांक जोडणी इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.
मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना या ॲपद्वारे विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामध्ये ॲपद्वारे दिव्यांग मतदार तळमजल्यावरील मतदान केंद्राची मागणी नोंदवू शकतात. रॅम्प व्यवस्था मागणी नोंदविणे, चिन्हांकीत रस्ता, पार्कींग सुविधा, ब्रेल लिपीतील मतदार स्लीप व डमी बॅलेट शीट मागणी, स्वयंसेवक तथा सहाय्यक मागणी, व्हील चेअर मागणी, वाहतुक व्यवस्थेची मागणी या सर्व सुविधांची मागणी सदर अॅपचा उपयोग करुन करता येते.
जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये saksham – ECI हे अॅप डाउनलोड करुन सुविधांचा लाभ घ्यावा व 100 टक्के मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी केले आहे