कोल्हापुरात काँग्रेसमध्ये भूकंप, महाविकास आघाडीला मोठा झटका, अधिकृत उमेदवारानेच घेतली माघार, काय घडलं?

कोल्हापूर :- उत्तर कोल्हापूर मतदारसंघात आज अतिशय नाट्यमय आणि हायव्होल्टेज घडामोडी घडल्या. उत्तर कोल्हापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही क्षण बाकी असताना आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली. काँग्रेसचे राजेश लाटकर यांच्या बंडखोरीला कंटाळून मधुरिमा राजे यांनी आपला अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण यामुळे महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का बसला. कारण आता उत्तर कोल्हापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून अधिकृत असा एकही उमेदवार नाही. उत्तर कोल्हापुरात अशाप्रकारच्या धक्कादायक राजकीय घटना घडण्याची ही पहिली वेळ नाही. गेल्या काही दिवसांपासून तिथे प्रचंड नाट्यमय राजकीय घडामोडी घडतच आहेत.

उत्तर कोल्हापूरच्या सध्याच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात आली. पण जयश्री जाधव या आपल्या उमेदवारीसाठी प्रचंड आग्रही होत्या. असं असताना पक्षाने आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर जयश्री जाधव आणि राजेश लाटकर यांच्या विरोधातील पक्षातील एक गट तीव्र नाराज झाला होता. या दरम्यान जयश्री जाधव यांनी टोकाचा निर्णय घेत थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर दुसरीकडे स्थानिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे काँग्रेसला उत्तर कोल्हापूरचा उमेदवार बदलावा लागला.

राजेश लाटकर सकाळपासून नॉट रिचेबल

काँग्रेस पक्षाने मधुरिमा राजे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. पण असं असताना राजेश लाटकर हे आपल्या उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या बंडाला थोपवण्यासाठी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले. विशेष म्हणजे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती स्वत: राजेश लाटकर यांच्या घरी गेले. पण राजेश लाटकर सकाळी साडेआठ वाजेपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत होती.

मधुरिमा राजे यांनी माघार घेऊ नये यासाठी सतेज पाटील पोहोचले पण…

काँग्रेस नेत्यांकडून राजेश लाटकर यांची समजूत काढण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले. पण राजेश लाटकर यांनी माघार घेतली नाही. अखेर मधुरिमा राजे यांनी राजेश लाटकर यांच्या भूमिकेमुळे माघार घेतली. मधुरिमा राजे यांच्याकडे पक्षाची अधिकृत उमेदवारी होती. तरिसुद्धा त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेस नेतेच चक्रावले आहेत. मधुरिमा राजे यांना उमेदवारी अर्ज मागेच घ्यायचा होता तर इतका अट्टहास का केला? अशी चर्चा आता कोल्हापुरात रंगली आहे. दरम्यान, मधुरिमा राजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी आमदार सतेज पाटील देखील पोहोचले होते. पण तोपर्यंत मधुरिमा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला होता. त्यामुळे सतेज पाटील हे देखील नाराज झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानसभा निवडणुक २०२४ - महाराष्ट्रातील ओबीसी जनतेचा जाहीरनामा !

Tue Nov 5 , 2024
नागपूर :- महाराष्ट्राची आगामी निवडणुक ही, 12.16 कोटी जनतेच्या जीवनमानाच्या भविष्याची वाटचाल संबधाने महत्वाची घटना आहे. आपल्या दृष्टीने ही निवडणूक व येणारी सत्ता सामान्य नागरिकांचे जीवन अधिक ऊन्नत करणारी, वंचितासाठी अधिक न्यायपुर्ण व सहभागी तसेच समावेशी विकासात्मक नीती निर्धारण करणाऱ्या प्रतिनिधित्वासाठीची आहे. यासाठी महाराष्ट्रातील 9.25 कोटी मतदार आपल्या विवेकाच्या अनुभवाची कसोटी लावणार आहे. आपल्या समोर, या जनप्रतिनिधींचा वा राजकीय पक्षाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!