नागपूर :- प्रधान महालेखाकार लेखा आणि हकदारी -2 नागपूर यांच्या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रातील विदर्भ आणि नागपूर क्षेत्रातील 19 जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणाकरिता प्रधान महालेखापाल कार्यालय नागपुर यांच्याव्दारे इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर्स – ई-पीपीओ आणि सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समाधानासाठी ‘पेंशन समाधान एक डिजीटल विंडो’ हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. एक पथदर्शी प्रकल्प म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नागपुर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचा-यांंना ई-पीपीओ डिजीटील पुढाकाराचा शुभारंभ जया भगत, प्रधान महालेखापाल यांचे हस्ते करण्यात आला होता.
या प्रकल्पाचा विस्तार आता मराठवाडा आणि विदर्भातील सर्व 19 जिल्ह्यात करण्यात आला असून या ईपीपीओ प्रकल्पाच्या यशस्वी चाचणीला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 22 मे 2024 रोजी एका शासन निर्णयाद्वारे मान्यता देऊन 1 जून 2024 पासून महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागातील सर्व 19 जिल्ह्यांसाठी पीपीओ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रधान महालेखापाल कार्यालयाद्वारे एक पारदर्शक, सुरक्षित आणि वापरकर्त्यास अनुकूल असे माध्यम म्हणजे ई-पीपीओ या सुविधेचा निवृत्ती धारकांना घेता येणार असून निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या निवृत्ती वेतनाच्या स्थितीबद्दल मोबाईल मध्ये एसएमएस द्वारे सूचना मिळतील. या सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकाला प्राधिकार पत्रे त्याच दिवशी प्राप्त होतील ज्या दिवशी प्राधिकार पत्रे अंतिम होतील आणि पेन्शनरला केव्हाही व कुठूनही सहज उपलब्ध होतील.डिजिटल पीपीओ,जलदगती प्रक्रिया व तात्काळ वितरण,एस एम एस द्वारे पेन्शनर ला सूचनेद्वारे तात्काळ माहिती,महाराष्ट्र शासनाच्या “महाकोष” संकेतस्थळावर ई-पीपीओची सहज उपलब्धता ही या ई-पीपीओची वैशिष्ट्ये आहेत.
सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समाधानासाठी ‘पेंशन समाधान एक डिजीटल विंडो’ च्या माध्यमातून या कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या गुगल फॉर्म, ऑनलाइन हेल्प डेस्क, टोल फ्री क्रमांक, प्रत्यक्ष अर्ज याद्वारे तक्रारी नोंदवल्या जाऊ शकतात . निवृत्तीवेतनधारकांशी व्हाट्सअप , झुम या माध्यमांद्वारे संपर्क साधला जाऊन त्यांच्या तक्रारीचे निवारण समोरासमोर केले जाते . आतापर्यंत 250 हुन अधिक निवृत्तीवेतनधारकांनी या समाधान मंचाच्या माध्यमातून त्यांच्या तक्रारीचे निराकरण केले आहे.
प्रधान महालेखाकार कार्यालयाच्या वतीने निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेल्या या दोन्ही डिजिटल उपक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन प्रधान महालेखापाल जया भगत यांच्या द्वारे करण्यात आले आहे.