नागपूर :- मोदी सरकारच्या कार्यकाळात आर्थिक क्षेत्रात अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे देशाची विक्रमी वेगाने प्रगती झाली आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शनिवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाठक बोलत होते. प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. यूपीए सरकारच्या काळातील आर्थिक गैरव्यवहार आणि ढिसाळ,भ्रष्ट कारभाराचे काळे वास्तव जनतेसमोर ठेवणे गरजेचे होते म्हणूनच केंद्र सरकारने संसदेत श्वेतपत्रिका सादर केली असल्याचे पाठक यांनी नमूद केले.
पाठक यांनी यावेळी, 2004 ते 2014 या यूपीए सरकारने देशाची अर्थव्यवस्था अस्थिर, कमकुवत करत देश कसा रसातळाला नेला याचा लेखाजोखा सादर केला. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर असंख्य आव्हाने सरकारसमोर होती मात्र या आव्हानांचा प्रभावीपणे सामना करत,चोख आर्थिक नियोजन व योजनांच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. नजीकच्या काळात आपली अर्थव्यवस्था तिस-या स्थानावर झेप घेईल असा विश्वास पाठक यांनी व्यक्त केला.
यूपीए आणि एनडीए सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळातील अर्थव्यवस्थेचे तसेच वीज,पाणी, गॅस,शैक्षणिक सुविधा आदी क्षेत्रातील कामगिरीची तुलनात्मक आकडेवारी मांडत पाठक यांनी यूपीए सरकारच्या गैरकारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले की यूपीएच्या काळात भारताचा सरासरी महागाईचा दर तब्बल 8.2 % वर पोहोचला होता त्यामुळे सामान्य जनतेला सतत 10 वर्षे महागाईची झळ सोसावी लागली, परंतु मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत बदल करून महागाईचा दर 5 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात यश मिळवलं आहे. कोविड संकट येऊनही भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. अंत्योदयाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आखलेल्या योजनांमुळे 25 कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या वर आली आहे.
यूपीए सरकारच्या काळात मंत्र्यांच्या निकटवर्तियांना कर्जे देण्यासाठी हस्तक्षेप होत असल्याने बँकांच्या बुडीत कर्जामध्ये अव्वाच्या सव्वा वाढ होऊन, पूर्ण बँकिंग यंत्रणा डबघाईला आली होती. मोदी सरकारच्या बँकिंग धोरणामुळे अनेक बँका कार्यक्षम होऊन देशाला विकसित भारत बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. यूपीए च्या काळात संपूर्ण देशात केवळ 14 कोटी गॅस कनेक्शन्स होती. आता मोदी सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून केवळ 10 वर्षांत तो आकडा 31 कोटींच्याही पुढे गेला आहे. यूपीए काळात ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण करण्यात अपयश आले. एनडीए काळात मात्र 100% विद्युतीकरण करण्यात आले. यूपीए काळात जिथे देशात सरासरी 12 तास वीज मिळायची तिथे आज एनडीए काळात 20.6 तास वीज मिळते.2014 मध्ये ग्रामीण भागात केवळ 3 कोटी घरांमध्ये स्वच्छ पाण्याचे नळ होते. मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात जलजीवन मिशनच्या अंतर्गत तो आकडा तबब्ल 13.8 कोटींच्याही पुढे गेला आहे. डीबीटीच्या माध्यमातून यूपीए सरकारच्या काळात केवळ 10 कोटी लाभार्थी होते तिथे आज मोदी सरकारच्या काळात वेगवेगळ्या 310 योजनांचे तब्बल 166 कोटी लाभार्थी आहेत. त्यामुळे गेल्या 10 वर्षांत 25 कोटींहून अधिक लोक गरिबीतून मुक्त झाले आहेत. यूपीए सरकारच्या काळात देशात मोबाईल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 6 कोटी होती ती आज 90 कोटींहून अधिक आहे.आज गावागावात हाय स्पीड 5G इंटरनेट सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे.
मोदी सरकारने कार्यकाळात शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करत प्रगती साध्य केल्याचे सांगत पाठक म्हणाले की, यूपीए काळात मेडिकल कॉलेजेसची संख्या केवळ 387 होती, आता मोदी सरकारच्या काळात ही संख्या 706 वर गेली आहे. यूपीए सरकारच्या काळात देशात एकूण 51 हजार जागा वैद्यकीय शिक्षणासाठी उपलब्ध होत्या तर मोदी सरकारच्या कालावधीत ही संख्या तब्बल 1 लाखाच्या वर गेली आहे. आज देशात 1168 विद्यापीठे आहेत जी यूपीए सरकारच्या काळात केवळ 676 होती.
पायाभूत सुविधा बळकटीकरणाकडे मोदी सरकारने मोठे प्राधान्य दिल्याचे पाठक म्हणाले.देशातील 20 शहरांत मेट्रो आहेत मात्र यूपीए च्या काळात ही संख्या केवळ 5 होती. देशात दिवसाला सुमारे 28 किमी इतक्या प्रचंड वेगाने नवीन रस्ते बांधून होत आहेत. यूपीए सरकारच्या काळात ही संख्या केवळ 12 किलोमीटर इतकी होती. मागील 10 वर्षांमध्ये देशात 54 हजार किमी लांबीचे महामार्ग बांधून झाले आहेत. यूपीए सरकारच्या काळात ही संख्या केवळ 25 हजार किलोमीटर होती. देशात कार्यरत असणाऱ्या विमानतळांची संख्या यूपीए च्या काळातील 74 वरून 149 वर पोहोचली आहे. यूपीए सरकारच्या काळातील 7.6 बिलियन डॉलर निर्यातीचा आकडा आज 22.7 बिलियन डॉलर अशा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. आज तब्बल 1 लाख 17 हजाराहून अधिक स्टार्टअप देशभरात नोंदवले गेले आहेत याउलट यूपीए सरकारच्या काळात केवळ 350 स्टार्टअप देशात होते. एकूणच गेल्या 10 वर्षांत मोदी सरकारने देशाचा चौफेर विकास साधल्याचेही पाठक यांनी सांगितले.