संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-उज्वला गॅस योजना बनली ‘गले की हड्डी’
कामठी :- मागील चार वर्षापासून टप्प्याटप्प्याने गरिबांचे घरगुती इंधन असलेल्या रॉकेलला शासनाने रेशनकार्ड वरून हद्दपार केले आहे.शासनाने उज्वला गॅस योजना तसेच घरोघरी वीज पोहोचवून सर्वसामान्याची रॉकेलशी नाळ तोडून टाकली. परंतु आता उज्वला गॅस योजना व वीजही महागात पडत आहे त्यामुळे गरिबांची कुचंबणा होत असून ग्रामीण भागातील जनतेला महिन्याला किमान पाच लिटर केरोसीन देण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे.सध्या ग्रामीण भागात केरोसीन मिळने दुरापास्त झाले आहे.
कधी कधी होणारे विजेचे भारनियमन, ग्रामीण भागात वारंवार होणारा विजपूरवठा यामुळे गावखेड्यात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असल्याचे दिसून येते.त्यातच दरमहा येणाऱ्या भरमसाठ विजबिलाने गरिबांचे कंबरडे मोडले आहे. हातावर पोट असणाऱ्यांना संसाराचा गाळा चालविणे कठीण झाले आहे.विजकंपनी थकीत वीज देयकासाठी विजपूरवठा खंडित करते त्यामुळे अनेकांच्या घरातील उजेड नाहीसा होतो.त्यांच्याकडे केरोसीन नसल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागते.शासनाने सुरुवातीला उज्वला गॅस चा मोफत पुरवठा केला.धुरमुक्त घर करणे व जंगलाची होणारी तोड कमी करणे यासाठी शासन प्रयत्नशील असली तरी आता गॅस ची किंमत आकाशाला भिडल्याने ही योजना गरीबांसाठी गले की हड्डी बनली आहे कारण गॅस पुरवठा केल्यानंतर कुटुंबाच्या शिधापत्रिकेतून केरोसीन कमी करण्याचा नियम असल्याने बहुतेक शिधापत्रिकेतून केरोसीन कायमचे हद्दपार झाले आहे.एकीकडे घरात गॅस उपलब्ध झाल्याने घरातील अंधार नाहीसा होण्याऐवजो घरात अंधारच पसरताना दिसून येत आहे.
@ फाईल फोटो