मोदी-शहांच्या विरोधात महाराष्ट्रात वारंवार दंड थोपटणाऱ्या महा विकास आघाडीची मोठी गंमत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची डोकेदुखी कायम असतानाच, घटकपक्षांमधील धुसफुसही वाढत आहे. त्यातही आघाडीचं नेतृत्व आणि उबाठा शिवसेनेची आक्रमकता यामुळे कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्याचा स्फोट झालाच ! मविआतील दुसरे संजय (निरुपम) यांनी हा बॉम्ब टाकला. उबाठा शिवसेनेला “बची-खुची शिवसेना” म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना (आणि पहिल्या संजयलाही) थेट ललकारलं आहे. याआधी जागा वाटपावरून दोन संजयांमध्ये “उवाच-युद्ध” रंगलं होतं. यावेळी दुसऱ्या संजयनं थेट सेनापतीवरच वार केला आहे.
मुद्दा जागावाटप हाच आहे. पण, प्रामुख्यानं एकाच जागेचा आहे आणि त्या जागेवर स्वत: संजय निरुपमचा दावा असल्यानं त्यांनी संतापून शिवसेनेवर हल्ला केला. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचं जागावाटप ठरलेलं नसतानाच, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांचं नाव जाहीर करून टाकलं. (शिंदे शिवसेनेचे गजानन कीर्तिकर हे सध्या खासदार असून, अमोल त्यांचा मुलगा आहे.) निरुपमला तर येथूनच तिकीट हवं आहे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अमोल कीर्तिकर हे नाव ऐकल्याबरोबर निरुपमचं माथं भडकलं अन् त्यांनी एक्सवर एक दीर्घ ट्विट केलं. त्याची सुरुवातच प्रक्षोभक आहे- “कल शाम बची-खुची शिवसेनाके प्रमुखने अंधेरीमे उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रसे मविआका उम्मीदवार घोषित कर दिया।” जागावाटप अद्याप निश्चित झालेलं नसताना असं कसं होऊ शकतं ? हा त्यांचा सवाल आहे. हे सरळसरळ आघाडीधर्माचं उल्लंघन आहे किंवा काँग्रेसला कमी लेखण्याचा प्रयत्न तरी आहे. मी गेली 5 वर्षे हा मतदारसंघ बांधतो आहे, माझा त्यावर दावा आहे, विद्यमान खासदार विरोधी पक्षात आहेत असे युक्तिवाद त्यांनी स्वसमर्थनार्थ केले आहेत. कोविड काळात झालेल्या खिचडी घोटाळ्यात या अमोल कीर्तिकरनं कमिशन खाल्लं असून, त्यांची ईडी चौकशी सुरू आहे. अशा घोटाळेबाजाचा प्रचार आम्ही करायचा का, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
उबाठा शिवसेनेनं या मतदारसंघावर दावा करताना असा युक्तिवाद केला की, ही जागा मूळची आमची म्हणजे शिवसेनेची आहे. यात ते चाल अशी खेळले की, महाबंडात सहभागी गजानन कीर्तिकरांचा मुलगाच त्यांनी मैदानात आणला, जेणेकरून शिंदेसेनेची गोची व्हावी. मागे मिलिंद देवरा कॉंग्रेसबाहेर पडण्याच्या वेळीही दक्षिण मुंबईवरून असाच वाद झाला होता. देवरांची बाजू घेताना संजय निरुपमनं उबाठा शिवसेनेला डिवचलं होतं. “भाजपासोबतच्या युतीमुळे शिवसेनेला गेल्या वेळी 18 जागी यश मिळालं होतं. यंदा त्यांना एकही जागा मिळू शकणार नाही,” असा शाप त्यांनी उबाठा शिवसेनेला दिला होता ! यावर उबाठा शिवसेनेचे सध्याचे खासदार आणि दावेदार अरविंद सावंत म्हणाले होते- “काँग्रेसचे तर सध्या शून्यच खासदार आहेत (एकमेव, चंद्रपूरचे बाळू खानोरकर यांचं निधन झालं) हे त्यांनी विसरू नये !” विश्वप्रवक्ते या वादात बोलले- “कोण निरुपम ?” (दोघेही एकेकाळी ‘सामना’ परिवारात एकत्र पत्रकार होते आणि शिवसेनेतही 2004 ते 2006 एकावेळी राज्यसभा सदस्यही राहिले असताना हा प्रश्न !)
मुळात निरुपम शिवसैनिकच आहेत. पण त्यांनी प्रमोद महाजनांशी पंगा घेतल्यामुळे बाळासाहेबांनी त्यांना 2006 मध्ये काढून टाकलं. म्हणून त्यांचा शिवसेनेवर, उद्धव ठाकरेंवर, राऊतांवर राग आहे. त्यामुळे ते अधूनमधून, संधी मिळताच शिवसेनेला चिमटे काढतच असतात. यावेळी त्यांनी “शिल्लक शिवसेना” अशी टिंगल करीत थेट उद्धव ठाकरेंनाच झोंबेल असं हिणवलं आहे. यावरून दोन संजयांमध्ये काय महाभारत घडतं ते पाहायचं.
– विनोद देशमुख