संत रोहिदास महाराजांनी देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेले…
संत रोहिदास (रविदास) महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे पुण्यात अभिवादन…
चर्मकार समाजातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेणार…
पुणे – स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची शिकवण देणारे महान संत रोहिदास (रविदास) महाराज यांच्या नावाने सामाजिक न्याय विभागामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय ‘संत रविदास पुरस्कार’ कोविडमुळे गेली दोन वर्षे स्थगित होता, या पुरस्कारांची यावर्षी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आज सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुणे येथील कार्यक्रमात दिली.
संत रोहिदास (रविदास) महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शिवशंभूनगर, कात्रज, पुणे येथील गुरु रोहिदास (रविदास) महाराज मंदिरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आयोजित जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रत्येक समाज घटकाला समान वागणूक मिळावी, जाती-पातीच्या भिंती कोसळून एकमेकांप्रती प्रेम व आदरभाव निर्माण व्हावा या महान विचारसरणीचा संत रोहिदास महाराजांनी भक्तिमार्गाने देशभरात प्रचार आणि प्रसार करून देशाला सामाजिक व आध्यात्मिक उंचीवर नेऊन पोचवले, असेही धनंजय मुंडे बोलताना म्हणाले.
सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मकार व चर्मोद्योग विकास महामंडळामार्फत राज्यातील तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच महामंडळाचे भागभांडवल यावर्षी पासून वाढविण्यात येणार असून, याची अधिकृत घोषणा लवकरच होईल, असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. महामंडळाच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची यावेळी त्यांनी माहिती दिली.
यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, उपायुक्त उमेश सोनवणे, नगरसेवक प्रकाश कदम, अखिल भारतीय रविदाशिया धर्म संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर, रतनलालजी सोनाग्रा आदी उपस्थित होते. कार्यक्रमात संघटनेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना विविध पुरस्कार वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमस्थळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांसाठी पुस्तकांचे दालन ठेवण्यात आले, तसेच बार्टीच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.