नागपूर : वीज उत्पादनाच्या प्रक्रियेत अविरत कार्यरत असलेल्या मनुष्यबळाच्या सुप्तगुणांना वाव देण्याकरिता दरवर्षी महानिर्मितीतर्फे आंतर विद्युत केंद्र नाट्यस्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राकडे यजमान पद असून ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान सायंटीफिक सभागृह, लक्ष्मीनगर, नागपूर येथे ही स्पर्धा होणार असून सकाळी ११ व सायंकाळी ६ अशा दोन सत्रांमध्ये रोज दोन नाट्यप्रयोग होणार आहेत.
६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.०० वाजता उद्घाटन सोहळा तर १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पारितोषिक समारंभ, मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
महानिर्मितीचे राज्यभरातील औष्णिक, जल, वायू विद्युत केंद्रांचे एकूण १० नाट्यसंघ सहभागी होणार आहेत त्यात प्रामुख्याने ६ फेब्रुवारीला खापरखेडा(नथिंग टू से), कोराडी (पहाटेचा मृत्यू), ७ फेब्रुवारीला पोफळी (उदकशांत), मुंबई (झाला अनंत हनुमंत) ,८ फेब्रुवारीला पारस (गटार), नाशिक(आमचं तुमचं नाटक), ९ फेब्रुवारीला परळी(केस नंबर ९९), चंद्रपूर(परफेकट मिसमॅच), १० फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता भूसावळ (वेडात म्हातारे वेगात दौडले तीन ), दुपारी ३ वाजता उरण (गोलमाल) या नाट्यकृतींचा समावेश आहे.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रवीण कुळकर्णी, संजय हळदीकर,वैदेही चवरे(सोईतकर) यांचेकडे सदर नाट्यस्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तरी, नागपुरातील नाट्य रसिकांनी या नि:शुल्क दर्जेदार नाट्यकृतींचा भरपूर आस्वाद घ्यावा असे नाट्यस्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा मुख्य अभियंता खापरखेडा वीज केंद्र सुनील रामटेके यांनी आवाहन केले आहे.