मुंबई : ‘ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या निधनाने माध्यमविश्वातील एक मार्गदर्शक हरपला. आपले विचार संयतपणे मांडून त्यावर ठाम राहणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी लेखक, निवेदक आणि पत्रकार आपण गमावला आहे,’ अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ‘विश्वास मेहेंदळे केवळ एक लेखक नव्हते. ‘ पाच सरसंघचालक’ ‘यशवंतराव ते विलासराव’, ‘आपले पंतप्रधान’ ही त्यांची गाजलेली काही पुस्तके आहेत. पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्यांसाठी ते एक संस्था होते. संयतपणे आणि विचारांवर ठाम राहत निःपक्षपाती पत्रकारिता कशी करता येते, याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या कामातून शिकवण दिली. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा एक मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.’