– बौद्ध पौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न
वाडी :- जगातील मानव जातीला सत्य,अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे महाकारूणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त शांतीनगर,दाभा येथील महाप्रज्ञा बौद्ध विहारात बुद्ध महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न करण्यात आले. सर्वप्रथम सकाळी भंदंत संघकिर्ती यांच्या हस्ते पंचशील धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तदनंतर भिख्खू संघातर्फे उपासक-उपासिकांसाठी महापरित्राण पाठ व धम्मदेशना संपन्न झाली. यावेळी शेकडो उपासकांना भोजनदान देण्यात आले.
यावेळी महाप्रज्ञा बौद्ध विहारात वास्तव्यास असलेले भदंत संघकीर्ती महाथेरो यांना धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी उपासकांतर्फे मारुती कंपनी ची S Presso चारचाकी धम्मयान दान स्वरूप देण्यात आले.या धम्मयानाची चावी उपस्थित भदंत महापंथ महाथेरो,माजी जि.प.सदस्य दिनेश बन्सोड,राष्ट्रवादी सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे,माजी नगरसेवक श्याम मंडपे,माजी उपसरपंच दत्ताजी वानखडे,दिलीप मेंढे,निवृत्त पोलीस अधिकारी प्राणेश भगत सह राजेश जंगले,ज्ञानेश्वर गोसावी,अंगदा चोखांद्रे,सुभाष मुन यांचे हस्ते भदंत संघकीर्ती महाथेरो यांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी मारुती सेवा येथील अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार ही करण्यात आला. तर उपासक-उपासिकांच्या प्रबोधनासाठी भव्य बुद्ध-भीम गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने उपासक-उपासिकां यांची उपस्थिती होती.यशस्वीतेसाठी महाप्रज्ञा उपासक- उपासिका संघाने अथक परिश्रम घेतले.