ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आयुष्मान भारत हेल्थ कार्डचे वितरण

मुंबई :- ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’चे वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव एन. नवीन सोना, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तुकाराम मुंढे आदी मंचावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम दर्जाची आरोग्यसेवा मिळावी यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने राबविण्यात आले. या माध्यमातून महिलांची तपासणी करण्यात आली. हे अभियान 31 ऑक्टोबरपर्यंत राबवले जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘आयुष्मान भारत हेल्थ कार्ड’ कार्यक्रम आरोग्य क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. आभा कार्डचा बहुविध उपयोग होणार आहे. आयुष्मान भारत हेल्थ कार्डमुळे आरोग्य क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रात बदल अपेक्षित आहे. आजार झाल्यास उपचार घेण्याबरोबरच आजार होऊ नये यासाठी काळजी घेणे देखील या कार्डमुळे शक्य होणार आहे.

आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी राज्य शासनाचा आरोग्य व्यवस्थेचे विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्यावर भर आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य सेवा आणखी गतिमान होण्यासाठी मदत होईल, असे सांगितले.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व्यापक आणि बळकट करण्यासाठी आयुष्मान भारत प्रभावी भूमिका बजावणार असल्याचे सांगितले. हेल्थ – वेलनेस सेंटर, टेली कन्सल्टेशन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत हेल्थ कार्ड हे चार अतिशय महत्त्वाचे उपक्रम आहेत. यामुळे आरोग्य क्षेत्रात बदल होतील असे सांगितले.

आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त आरोग्यसेवा तुकाराम मुंढे यांनी आभार मानले. सहसचिव दिलीप गावडे, उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड, संजय सरवदे, डॉ. कैलास बाविस्कर, डॉ. माले आदी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी तनुजा गावकर, उर्मिला बारामते, श्रावणी आंगणे, संजय खापरे, विशाल शिरसाट, आविश कणगी यांना आयुष्मान भारत हेल्थ कार्ड वितरित करण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वित्झर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत मुंबईतील 5 विद्यार्थ्यांचा सहभाग

Wed Oct 5 , 2022
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा मुंबई :- जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे येत्या 13 ते 16 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज’ ह्या आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेसाठी मुंबईतील 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयात भेट घेतली. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या सहाय्यक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights