पुणे :- दिव्यांगांचे लोकशाहीत महत्वाचे योगदान असून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अधिकाधिक पात्र दिव्यांग नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन घोले मार्ग येथील महानगरपालिका क्षेत्रिय कार्यालयात आयोजित दिव्यांग मेळाव्यात करण्यात आले.
यावेळी समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास, मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, सहाय्यक आयुक्त रवी कंधारे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सायली धस, पांडुरंग महाडिक, स्वीपचे समन्वयक दिपक कदम, सागर काशिद ,इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा श्रृणाली आपटे आदी उपस्थित होते.
आगामी लोकसभा सावत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक दिव्यांग नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याकरीता प्रशासनाच्यावतीने विशेष मतदार नोंदणी व मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांनी निवडणुकीच्यावेळी अधिकाधिक संख्येने मतदान करावे. तसेच आपल्या परिसरातील अधिकाधिक नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करण्याबरोबतच त्यांना निवडणुकीच्यावेळी मतदान करण्याबाबत प्रोत्साहित करावे. यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://www.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा ‘वोटर हेल्पलाईन अॅप’ वर अधिकाधिक दिव्यांग नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या मेळाव्यात एकूण १३८ दिव्यांग नागरिक सहभागी झाले होते. यावेळी ४५ दिव्यांग मतदारांना मतदार ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच ११ दिव्यांग नागरिकांची नव मतदार म्हणून नोंदणी करण्याची प्रक्रिया करण्यात आली. यावेळी दिव्यांग मतदारांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली.