नागपूर :- नागपूर हे उपराजधानीचे ठिकाण असल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधांसह येथे विभागीय क्रीडा संकुल उभारणी झाल्यास या सर्व सोयी सुविधांचा फायदा नागपूरसह विदर्भातील खेळाडुंना होईल, त्यासाठी प्रस्तावित संकुलात अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या. तसेच, नागपूर स्मार्ट स्पोर्ट सिटी म्हणून विकसित व्हावे, असे मत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे व्यक्त केले
विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक आज विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली, यावेळी बिदरी बोलत होत्या. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
विभागीय क्रीडा संकुलाच्या जागेवर खेळाडुंसाठी अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्याची मागणी खेळाडुंकडून वारंवार होत आहे. सुविधांच्या बळकटीकरणासाठी स्पोर्टस क्लब, अद्ययावत फुटबॉल स्टेडियम, मल्टीजीम, ऑलिंपिक, जलतरण तलाव, साहसी क्रीडा प्रकार सुविधांसोबतच नॅशनल गेम्स, खेलो इंडिया गेम्ससाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा विभागीय क्रीडा संकुलात उपलब्ध करून देणे प्रस्तावित आहे. या बैठकीत या विषयांवर चर्चा झाली .
येत्या काळात नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारणे आवश्यक आहे. या संकुलात वाणिज्यिक सुविधा उभारण्यासाठी वास्तुविशारद व्यवस्थापक सल्लागाराची लवकरच नियुक्ती करण्यात येईल, असे या बैठकीत ठरले .