नागपूर :-अरूण जोशी शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर येथे नुकतेच जागृती अंकाच्या विमोचनासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मोहन मते, आमदार, नागपूर, कल्याणी हुमने, क्राइम पोलीस निरीक्षक, अजनी, नागपूर, दिव्या धुरडे, माजी नगरसेविका, नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी उपस्थित होते.
सन्माननीय अतिथीगण व अध्यक्ष महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत ‘जागृती वार्षिक अंकाचे’ विमोचन करण्यात आले. या जागृती वार्षिक अंकाचे महत्व विशद करतांना अरूण जोशी म्हणाले, की विद्यार्थ्यांमधील विविध कला-गुणांना वाव मिळण्यासाठीच या जागृती वार्षिक अंकाच्या निर्मितीचे काम महाविद्यालयाद्वारे दरवर्षी हाती घेतल्या जाते.
या जागृती वार्षिक अंकामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले लेख, कविता, चारोळ्या, अध्यापनात समाविष्ट विषयांवर माहिती, थोर विचारवंताबाबत माहिती, थोर समाज सुधारक यांचेबाबत माहितीचा समावेश असतो. त्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी आपल्या जबाबदारीचे निर्वहन करतात.
कार्यक्रमास उपस्थित अतिथींनी सुद्धा या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांना अशा उपक्रमात सदैव सहभाग घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अचला तांबोळी, प्रा. डॉ. मेधा मोहरील, प्रा. अर्चना दुरगकर, प्रा. भावना इंगळे, प्रा. मिना गिरी व मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.