– 75 मधमाशीपालन करणारे शेतकऱ्यांचा सहभाग
नागपूर :- महाराष्ट्र शासन कृषी विभाग, खादी ग्रामोद्योग आयोग, हिस्लॉप कॉलेज आणि महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान अंतर्गत जागतिक मधुमक्षिका दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय परिसंवादाचे आयोजन शेतकरी भवन प्रशिक्षण सभागृह, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नागपूर कार्यालय, कदिमबाग, सिव्हील लाईन येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे होते तर हिस्लॉप कॉलेजचे प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. आशिष कुमार झा यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
उद्घाटनपर भाषणात डॉ आशिष कुमार झा यांनी शासनाच्या कृषी विभागाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचा आणि मधुमक्षिका पालनाच्या अनुषंगाने सद्यस्थिती आणि त्यासाठी लागणारे साहित्य व विषमुक्त मध तयार कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केले.
अध्यक्षीय भाषणात विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी मधुमक्षिकापालन करणाऱ्या सर्व उद्योजक शेतकरी यांना जागतिक मधुमक्षिकापालन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि या क्षेत्रात काम करणा-या सर्व घटकांनी आपसात समन्वय ठेऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.
या परिसंवादाच्या तांत्रिक मार्गदर्शन सत्रामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अधिनस्त कृषी संशोधन केंद्र, तारसाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ बिरादर यांनी मधुमक्षिका किटकाचे जीवन चक्र व त्यांना येणारे रोग व आजार याविषयी सविस्तर माहिती दिली. सोबतच ईझ्रायल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रिमोट सेन्सिंगचा वापर करून मोठ्या प्रमाणावर मधुमक्षिका पालन करता येतो याबद्दल शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून मार्गदर्शन केले.
हिस्लॉप कॉलेजच्या रिसर्च स्कॉलर जागृती राय यांनी डंखविरहित मधुमक्षिका पालन आणि मधुमक्षिका पालनातून तयार करण्यात आलेले सर्व पदार्थ विक्री व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. वानखेडे यांनी जिल्हा ग्रामोद्योग विभागाकडून उद्योजकांना व मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानावर असलेल्या योजनांची माहिती सांगितली आणि ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले.
कृषी उपसंचालक तथा नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प अरविंद उपरीकर यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत मधुमक्षिका संच तसेच कोरडवाहू क्षेत्र विकास अभियान अंतर्गत मधुमक्षिकापालनासाठी असलेल्या अनुदानाबाबत माहिती देऊन जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे येऊन महाडीबीटी फार्मर पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले. तसेच शेतकऱ्याच्या व्यतिरिक्त 18 वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत लाभ कशा पद्धतीने घ्यावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. मधुमक्षिका पालकांना मधुमक्षिका संच बसवण्यापूर्वी फुलझाडे फळझाडे व भाजीपाला पिके लागवड करावी लागते. त्यासाठी शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजनेचे लाभ घेण्यासाठी माहिती देण्यात आली.
परिसंवादाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे नागपूर यांनी केले. प्रास्ताविकात मनोहरे यांनी राष्ट्रीय मधुमक्षिकापालन अभियानात नागपूर जिल्ह्यात शासनाचे विविध विभाग, संशोधन संस्था, मधमाशापालन करणारे शेतकरी, बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच खाजगी कंपन्या आणि ग्राहक या मध उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, पैकेजिंग, ब्रांडिंग ते विक्री व्यवस्थापन या मुल्य साखळी मध्ये सर्व भागधारकांना समाविष्ठ करून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
जिल्हास्तरीय परिसंवादाचे सूत्रसंचालन अरविंद उपरिकर यांनी तर आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी युवराज चौधरी यांनी केले.
या जिल्हास्तरीय परिसंवादास जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील एकूण 75 पेक्षा जास्त मधमाशापालन करणारे शेतकरी, उद्योजक तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.