ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्लोबलच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

खुल्या प्रवर्गातील तरुणांसाठी ‘अमृत’ संस्था लवकरच सुरू होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे – खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक, रोजगार विषयक मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना केली असून लवकरच ती सुरू होईल. त्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील हुशार मुलांसाठी विविध योजना, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था कार्य करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्लोबलच्या (बीबीएनजी) वतीने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित परिवर्तन 2023 या उद्योग परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, आमदार गणपत गायकवाड, आमदार कुमार आयलानी, विवेक देशपांडे, मधुरा कुंभेजकर, अरविंद नांदापूरकर, अरविंद कोऱ्हाळकर, शिल्पा इनामदार, महेश देशपांडे, महेश जोशी, अभिनेते प्रशांत दामले, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांडगे आदी उपस्थित होते. उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ब्राह्मण समाजातील उद्योजकांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्यम कौस्तुभ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ब्राह्मण समाजाला एकेकाळी नोकरी हाच पर्याय होता. अलिकडच्या काळात मात्र आता सर्व क्षेत्रात ब्राह्मण समाज अग्रेसर दिसून येतो आहे. उद्योग क्षेत्रात ब्राह्मण समाजातील तरुणांची गरुड झेप पहावयास मिळत आहे. ब्राह्मण समाजात यशस्वी उद्योजक पहायला मिळतात. जगातील प्रमुख 7 कंपन्यांपैकी 4 प्रमुख कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे ब्राह्मण आहेत. सिलिकॉन व्हॅलीत समाजाचे तरुण काम करत आहेत. या माध्यमातून मोठे काम होत आहे. आज विविध समाजातील संघटना या समाजाच्या पाठिशी उभे राहून उद्योजकता, शिक्षण, व्यवसायिकता या विविध क्षेत्रात काम करत आहेत. कुठलेही वैयक्तिक स्वार्थ न ठेवता काम करत आहेत. ब्राह्मण समाजातील संघटना देखील नि:स्वार्थ वृत्तीने काम करताना दिसतात. बीबीएनजी सारख्या संस्था समाजासाठी वैयक्तिक स्वार्थ न ठेवता काम करतात, याचे समाधान वाटते. समाजाला ज्या ज्या वेळी जे जे आवश्यक होते ते ते देण्याचे काम ब्राह्मण समाजातील मान्यवरांनी केले आहे.

ते म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील पाचवी अर्थव्यवस्था आपण झालो आहोत. सन 2030 सालापर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ. आजच्या जगात व्यावसायिकता, उद्योगशिलता, नव्या उद्योगाला समजून घेणे व त्या क्षेत्रात पुढे जाणे आवश्यक आहे. दूरसंचार क्रांतीमुळे तरुण पिढीला मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. आजच्या काळात अशी संधी उपलब्ध आहे की, छोट्या गावातील तरुण स्टार्टअप सुरू करून मोठा उद्योग उभारु शकतो. कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा वारसा नसलेला युवक देखील एक यशस्वी उद्योजक बनू शकतो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे परिवर्तन घडत आहे. हे बदलते मूल्य समजून घेण्यात तरुणाई काम करत आहे. जगात उद्योग आणि विविध क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध हे सांगणारे व या संधी कशा प्राप्त कराव्या याबद्दल मार्गदर्शनाचे काम बीबीएनजी सारख्या संस्था करत आहेत. अनेक लोकांनी या संधीचा लाभ घेऊन आपलं विश्व तयार केले आहे. ज्या वेगाने देश पुढे चालला आहे. त्या वेगात ब्राह्मण समाजाने यापूर्वी देखील योगदान दिले आहे, यापुढेही ते करतील व देशाला पुढे नेण्याचे काम समाजातील तरुण करतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

समाजासाठी संस्थेच्या कार्यामध्ये काहीही मदत लागली, तर मी आपल्या पाठिशी उभा आहे. विशेषतः तरुणांच्या रोजगार, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी काम करु. मागील काळात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे 605 कोर्सेमध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्धे शुल्क भरण्याचा निर्णय घेतली. हुशार विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने जगातील उत्तम विद्यापीठामध्ये शिकता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी श्रीपाद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

Tue Feb 14 , 2023
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.13) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com