राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कुवलयानंद योग पुरस्कारांचे वितरण

-‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक 

– राज्यपाल

 पुणे :- माणसाचे जीवनमान उंचाविण्याची आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता योग साधनेत आहे. व्यापक अर्थाने आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि शांतता स्थापित करून ‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यातही योग उपयुक्त आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

लोणावळा येथील कैवल्यधाम योग संस्थेतर्फे आयोजित ‘स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार-2023’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला सीबीआयचे माजी महासंचालक डॉ.डी.आर. कार्तिकेयन, कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, सहव्यवस्थापक डॉ. आर. एस. भोगल, ऋषिकेश येथील स्वामी राम साधक ग्रामचे स्वामी रित्वन भारती, रवी दीक्षित आदी उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, योग केवळ निरोगी शरीरासाठीचा व्यायाम नसून ही शरीर, मन आणि आत्म्याशी संलग्न असलेली प्रक्रिया आहे. ती एक निरोगी जीवन जगण्याची शैली असून योगसाधनेचे अंतिम उद्दिष्ट आंतरिक शांती, सद्भावना आणि आत्मसंयमाचा विकास आहे. योगसाधनेद्वारे निर्माण होणारा आत्मसंयम आणि सहनशीलता शांततापूर्ण समाजनिर्मितीत उपयुक्त ठरते. देशातील लाखो युवकांसाठी रोजगाराच्या माध्यमातून समृद्धी आणण्यासाठी योग प्रेरक ठरू शकते.

भारताच्या योगविद्येला आज जगाने स्वीकारले आहे. ‘योग दिवस’ साजरा करण्यासोबत आपण ‘योग सप्ताह’ साजरा करण्याचाही विचार करावा. प्रत्येक शाळा-महाविद्यालयात या संदर्भातील आयोजन करण्यात येऊन प्रशिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना योगासनाच्या मूलभूत बाबी समजावून सांगाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कैवल्यधाम संस्थेत योगविद्येचे ‘ऑक्सफर्ड’ होण्याची क्षमता असल्याचे नमूद करून राज्यपाल म्हणाले की, या संस्थेने जगासाठी सर्वश्रेष्ठ योग शिक्षक तयार करून जगातील विविध देशात आपले केंद्र सुरू करावे. संस्थेने योगविद्येच्या प्रसारासाठी या क्षेत्रात संशोधन करणारे समर्पित विद्यापीठ व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यपाल रमेश बैस यांनी संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन केले.

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते डॉ. कार्तिकेयन, स्वामी रित्वन भारती यांना कुवलयानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना पुरस्कारार्थींनी योगाचे महत्त्व विषद केले.

कार्यक्रमापूर्वी राज्यपालांनी कैवल्यधाम योग संस्था परिसराला भेट दिली आणि तेथील ग्रंथालयाच्या कामकाजाची माहिती घेतली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जे जे रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देणार - मंत्री हसन मुश्रीफ

Tue Aug 29 , 2023
मुंबई :- सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सर ज. जी. (जे.जे.) रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सर ज.जी.रुग्णालयात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com