खेळाडुवृत्तीचे प्रदर्शन करा व विभागासाठी कार्यक्षमतेने कार्य करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

– जलसंपदा विभागाच्या चतुर्थ राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची दिमाखदार सुरुवात

– 1600 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग; 2 फेब्रुवारीपर्यंत स्पर्धेचे आयोजन

नागपूर :- राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडुवृत्तीचे उत्तम प्रदर्शन करा, आयुष्यात शरीर सदृढ ठेवा, व्यसनापासून दूर रहा आणि जलसंपदा विभागासाठी कार्यक्षमतेने कार्य करा, असा संदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी येथे विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाच्या रवि नगर येथील क्रीडा संकुलात जलसंपदा विभागाच्या चतुर्थ राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 चे उद्घाटन  महाजन यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे आदी उपस्थित होते. जलसंपदा विभागाच्या एकूण 9 विभागांचे 1600 खेळाडू सहभागी झाले असून 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, राज्यातील उद्योग, शेती, उर्जा प्रकल्प आदिंना पाणी पुरवठा करण्याची महत्वाची भूमिका जलसंपदा विभाग पार पाडत आहे. विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे हे कार्य अधिक प्रभावीपणे करता येते. त्याकरिता त्यांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम, आहार, विहार गरजेचा आहे. तसेच व्यसनापासून दूर राहणे तेवढेच महत्वाचे आहे. हे लक्षात घेवूनच या विभागाचा मंत्री म्हणून 2017 मध्ये छत्रपती संभाजी नगर येथे जलसंपदा विभागाची पहिली राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. स्वत: एक उत्तम खेळाडू असून गेल्या जवळपास 40 वर्षांच्या राजकीय जीवनातील व्यस्ततेतही नियमीत व्यायाम करतो व व्यसनापासून दूर असल्याचे सांगून त्यांनी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.

वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी शासकीय नोकरीमध्ये कामासोबतच खेळाला असलेल्या महत्वाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांच्या आंतरविभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्पर्धेमध्ये जिंकण्याची इच्छाशक्ती शेवटपर्यंत कायम ठेवून खेळाडुवृत्तीचे उत्तम प्रदर्शन करा,असा संदेश अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी यावेळी दिला.                      कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीत व महाराष्ट्र गिताने झाली. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिक्षक अभियंता सोनाली चोपडे यांनी क्रीडा शपथ दिली. सचिव संजय बेलसरे यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी सूत्रसंचलन केले तर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, श्री. महाजन यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. पोलीस बँड पथकाच्या तालावर दहा संघांनी यावेळी पथ संचलन केले. यात मंत्रालय मुंबई संघ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर, तापी पाट बंधारे विकास महामंडळ जळगाव, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिक, यांत्रिकी पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय पुणे, गुणनियंत्रण, जलविद्युत, मुख्यलेखा परीक्षक, जल व सिंचन छत्रपती संभाजीनगर, स्वेच्छेने सहभागी झालेले शेगाव येथील गजानन महाराज संस्थेचे सेवेकरी, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अशा 10 संघांचा समावेश होता.

शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर महाजन यांच्या हस्ते 100 मिटर धावण्याच्या स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून या आयोजनातील पहिल्या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

स्पर्धेत सहभागी 1600 खेळाडुंपैकी 550 महिला खेळाडू असून क्रिकेट, कबड्डी, व्हॉली बॉल आदी क्रीडा स्पर्धांसह गायन, संगीत, नाटक, एकांकिका, छायाचित्र आदी सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

180 किलो प्लास्टिक जप्त,गुप्त माहितीच्या आधारे मनपाची कारवाई

Fri Jan 31 , 2025
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई सुरू असुन उपद्रव शोध पथकाद्वारे रामनगर येथील साई पान शॉप येथे कारवाई करून खर्ऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे 180 किलो प्लास्टिक पन्नी जप्त करण्यात आल्या तसेच संबंधितांवर 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार 8 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!