नागपूर :- वीज ही मुलभूत गरज असल्याने ग्राहकाला उत्तमोत्तम सेवा द्या, त्यांच्या तक्रारींचा वेळीच निपटारा करा, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नागपूर येथे दिले. बुधवारी (दि. 9) रोजी महावितरणच्या विद्युत भवन येथे झालेल्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या नागपूर, चंद्रपूर गोंदीया, अकोला आणि अमरावती या पाचही परिमंडलाच्या संयुक्त आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
मागिल काही दिवसांत रोहीत्रे नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले असून महसुल वसुलीत देखील चांगले काम झाले आसले तरी त्यात अजूनही काम करण्यास संधी असल्याचे सांगत लोकेश चंद्र पुढे म्हणाले की, पायाभुत सुविधांची गरज नसलेल्या भागात 24 ते 48 तासात नवीन वीज जोडणी देण्यावर भर देतांनाच विश्वसनिय आणि दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी आपण सर्वांनी कार्यरत असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. प्रलंबित कामांचा लगेच निपटारा वेळीच करून ग्राहक सेवेच्या कार्याला गती देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना 2.0 अंतर्गत सौर कृषी प्रकल्पांसाठी जिल्हानिहाय उपलब्ध झालेल्या जागा, त्यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना याचसोबतच ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारी, प्रलंबित नवीन वीज जोडण्या, ईज ऑफ़ लिवींग, डीजीटल पेमेंट, आरडीएसएस आदी विषयांचा देखील त्यांनी परिमंडलनिहाय आढावा घेतला. ग्राहकाला अचूक वीजबिल दिल्यास मोठ्या प्रमाणात ग्राहकाच्या तक्रारी कमी होतील यासाठी नियुक्त कर्मचा-यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याब्वरही त्यांनी भर दिला.
या बैठकीला महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, प्रादेशिक कार्यकारी संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता (सामुग्री व्यवस्थापन) मनिष वाठ, मुख्य महाव्यवस्थापक (माहीती तंत्रज्ञान) अविनाश हावरे, विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश कोहाट, मुख्य अभियंता (देयके व वसुली) संजय पाटील, अधीक्षक अभियंता धाबर्डे, मुख्य अभियंता (चंद्रपूर) सुनिल देशपांडे, मुख्य अभियंता (गोंदीया) पुष्पा चव्हाण, मुख्य अभियंता (नागपूर) दिलीप दोडके, मुख्य अभियंता (अमरावती) ज्ञानेश कुलकर्णी, मुख्य अभियंता (अकोला) दत्तात्रय पडळकर यांचेसह या पाचही परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंते व कार्यकारी अभियंते या बैठकीला उपस्थित होते.