नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १४ ऑक्टोबर १९५६ नागपूरातील ऐतिहासिक दीक्षाभुमीस्थळी लाखो लोकांच्या उपस्थितीत धम्मदीक्षा सोहळा पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो लोक बौध्द अनुयायी व देशविदेशातील बौध्द उपासक-उपासिका यांच्या करीता दीक्षाभुमी नागपूर हे ऐतिहासिक धम्मक्रांतीचे प्रेरणास्त्रोत बनले असून या दीक्षाभुमी परिसरातील जागेकरीता राज्यातील बौध्दांनी संघर्ष करून दीक्षाभुमी मिळवलेली आहे. दरवर्षी या ऐतिहासीक दीक्षाभुमीला धम्मदीक्षा दीनी लाखो लोक अभिवादन करून प्रेरणा घेण्यासाठी येतात. अशा या ऐतिहासिक दीक्षाभुमीचे व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती दीक्षाभुमी नागपूर यांच्याकडे असुन सध्या या समीतीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई हे आहेत. शिवाय दीक्षाभुमीवर स्मारक समिती तर्फे एक महाविद्यालय देखील चालविले जात आहेत. मुंबईतील चैत्यभुमी अनेक वर्षे भारतीय बौध्द महासभेच्या अंतर्गत वादात अडकली व त्याचे परिणाम न्यायालयीन लडाईत देखील झाले त्याचप्रमाणे दिवंगत नेते रासु गवई यांच्यानंतर दीक्षाभुमी स्माकर समितीमध्ये सुध्दा अंतर्गत मतभेद असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहेत. अलीकडे तर स्मारक समितीचा सचिव कोण याबाबत वर्तमान पत्रातून जाहीर पत्रकबाजी झाली आहे. खरेतर यामागचा कर्ताकरवीता नेमका कोण हे अजूनतरी स्पष्ट व्हायचे आहे. याच पार्श्वभुमीवर व आगामी विधानसभा निवडणूका समोर असतांना दीक्षाभुमीचा वाद कुणीतरी पेटवीत तर नाहीना अशी पण शंका घ्यायला जागा आहे. नागपूरातील अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन जमीनदोस्त केल्यानंतर देखील अनेक महीने आंदोलन चालले, मी ही त्याला भेट दिलेली होती परंतु लोकसभा निवडणूकात हे आंदोलन का व कसे थंडावले याचा देखील अनेकांना प्रश्न आहेच त्यामुळे पवित्र दीक्षाभूमीवर लोक भावनेचा उद्रेक होणारच होता अनेक दिवसापासून हे प्रकरण धगधगत होते. शिवाय विकास व सौंदर्याकरण पार्किंग नावाखाली या ठिकाणी कोणते काम सुरू आहे याचा कधीही स्पष्ट उल्लेख आंबेडकरी जनतेसमोर कोणीही मांडला नाही. स्थानिक प्रशासन, सरकार व दीक्षाभूमी स्मारक समिती यांनी याची वेळीच दखल घेतली नाही त्यामुळे दीक्षाभूमीवरील हे लोक उद्रेकाचे आंदोलन म्हणजे एक प्रकारे मनमानी कारभाराविरूध्द सरकार व दीक्षाभूमी स्मारक समिती यांच्या बेलगाम कारवाई विरोधात हा लोकभावनेचा इशाराच होय. दीक्षाभूमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सदस्य यांनी जनतेसमोर यायला हव. मी स्वतः दि. २२ जुन २०२४ रोजी, सकाळी या पवित्र दीक्षाभुमी परिसराला भेट देवून पाहणी केलेली होती. चौकशी अंती असे समजले की दीक्षाभुमीवर गेल्या वर्षभरापासून कामकाज सुरू आहे त्याला २३० कोटीचा निधी महाराष्ट्र शासणाच्या समाज कल्याण खात्यातर्फे मंजूर केलेला आहे. परंतु त्या ठिकाणच्या कामाबाबत आंबेडकरी जनतेला कोणतीही माहीती दिलेली नाही. दिनांक १ जुलै २०२४ रोजी विधानसभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा करतांना सांगीतले की दीक्षाभुमीचा विकास आराखडा हा दीक्षाभुमी स्मारक समितीने केला असून सरकारने फक्त निधी पुरविला आहे हे पूर्ण सत्य वाटत नाही. शिवाय अशा आराखड्या बाबत दीक्षाभुमी स्मारक समितीने कमितकमी नागपूरातील आंबेडकरी जनतेला सूचित केले नसल्यामुळे दीक्षाभुमीच्या सौंदर्याकरण नावाखाली कुणाचे तरी व्यवसायीक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पवित्र दीक्षाभुमीचा वापर केला जातो की काय हाच खरा प्रश्न आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आंदोलकांसोबतच आणि वेळप्रसंगी सहभाग देखील करेल.