नागपूर :- मागील पंधरा दिवसापासून दीक्षाभूमीवरील बांधकामावर आक्षेप घेतल्या जात आहे. स्मारक समितीच्या वतीने आक्षेपकर्त्यांचे समाधानही केल्या जात आहे. बांधकाम व सौंदर्यीकरण तांत्रिकदृष्ट्या किती मजबूत व फायद्याचे आहे हेही पटवून दिल्या जात आहे.
सामाजिक न्याय विभाग, एनएमआरडी, स्मारक समिती तसेच सामाजिक व धार्मिक कार्यकर्त्यांच्या समन्वयासाठी अनेक बैठका सुद्धा झालेल्या आहेत. अंडरग्राउंड पार्किंगच्या संदर्भात विरोध करण्याची वेळ निघून गेली त्यामुळे बहुतेक आंबेडकरी मंडळी सौंदर्यकरण, बांधकाम व विकासाच्या बाजूने आहेत.
परंतु अजूनही ज्यांचे समाधान झाले नाही व जे मुळातच विरोधात आहेत असे स्मारक समितीच्या आवाहना नुसार त्याचेशी चर्चा करण्यासाठी उद्या दीक्षाभूमीवर येणार आहेत. शांतीचा मार्ग दाखविणाऱ्या दीक्षाभूमीवर कुठल्याही प्रकारचे अशांतीचे व असंवैधानिक काम त्यांच्याकडून होऊ नये, शासनातर्फे होत असलेल्या सौंदर्यीकरण व बांधकामात कुठल्याही प्रकारचा अडथळा आणू नये असे आवाहनही बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे. उत्तम शेवडे हे सुरुवाती पासून या प्रक्रियेत सहभागी आहेत.