साधू-संतांनी भारतीय समाज संस्कारित केला – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

– भगत कंवरराम सेवा मंडळ आणि सिंधू सभेतर्फे सत्कार सोहळा

नागपूर :- भारतातील विविध भागांत वेगळी संस्कृती आहे. पण इथे विषमता नाही. कारण संपूर्ण देश नैतिक मूल्यांच्या धाग्याने जोडला गेला आहे. भारतातील साधू-संतांनी ही नैतिक मूल्ये प्रदान केली आणि समाज संस्कारित केला, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी (शनिवार) केले.

भगत कंवरराम सेवा मंडळ आणि सिंधू सभा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संत कंवरराम साहिब यांच्या कन्या दादी ईश्वरीदेवी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ना.गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संत कंवरराम यांच्या आदर्शांवर आणि मूल्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून दादी ईश्वरीदेवी जीवन जगत आहेत. त्यांच्या कार्याचा आणि समर्पित आयुष्याचा गौरव ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. जरीपटका येथील दयानंद आर्य कन्या महाविद्यालयाच्या पिताश्री सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला संत कंवरराम साहिबचे चतुर्थ ज्योत गद्दीनशीन, नागपूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, भगत कंवरराम सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक केवलरामानी, साई राजेश लाल, कार्यक्रम संयोजक पी.टी. दारा यांची प्रमुख उपस्थिती होती. संतांनी दिलेले संस्कार ही भारताची शक्ती असल्याचे मत ना. गडकरी यांनी व्यक्त केले. ‘संत कंवरराम यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य आपल्याला माहिती आहे. त्यांच्यासारख्या साधू- संतांमुळेच संपूर्ण जगात भारतीय संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण ठरते. याचे महत्त्व पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्यावर आपल्याला लक्षात येते. मी ब्रिटनला गेलो असताना तेथील पंतप्रधानांनी मला सांगितले की त्यांच्या देशातील नवीन पिढी लग्न न करता केवळ लिव्ह-इनमध्ये राहणे पसंत करते आणि ही त्यांच्यासाठी खूप मोठी समस्या आहे. आपल्याकडे ही मुख्य समस्या नाही; कारण भारत ही साधू-संतांची भूमी आहे. आपला समाज संस्कारित करण्याचे काम साधूसंतांनी केले आहे आणि हेच आपले वैशिष्ट्य आहे.’ यावेळी त्यांनी ‘थोर महात्मे होऊन गेले… चरित्र त्यांचे पाहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे… हाच सापडे बोध खरा’ या ओळींचा दाखला दिला. सुप्रसिद्ध गायिका सलमा आगा, महान गायक गुलाम अली, अदनान सामी या मूळ पाकिस्तानी गायकांना व इतर कलावंतांना भारतीय संस्कृतीचे आकर्षण असल्याचे ते म्हणाले.

‘संत एका समाजाचे नसतात’

साधू-संत कोणत्याही एकाच समाजाचे नसतात. त्यांचे मार्गदर्शन फक्त एका धर्मासाठी नसते. संत कंवररामजी देखील एका समाजाचे नाहीत, असे मत व्यक्त करतानाच भारतीय संस्कृती सिंध आणि हिंद या शब्दांशी जुळलेली आहे, याचाही ना. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे दिलेल्या भाषणाचा दाखला दिला.

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठात 500 वृक्ष लागवडीचा शुभारंभ, विभागीय आयुक्त, कुलगुरू, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्या हस्ते वृक्षारोपण

Sun Jul 23 , 2023
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरातील आपत्ती व्यवस्थापन केंद्र परिसरामध्ये नव्याने दिड किलोमीटर रस्त्याची निर्मिती करण्यात आली असून त्या रस्त्याच्या दुतर्फा जवळपास 500 विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्ष लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय आयुक्त निधी पांडेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मनपा आयुक्त देविदास पवार यांच्या शुभहस्ते दिं. 24 […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com