– विभागाचे सक्षमीकरण, गतिमान कामकाजासाठी एकात्मिक संगणक प्रणाली
मुंबई :- क्रीडा विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच क्रीडा विकासाच्या बाबींचे सुनियोजित व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. विभागाचे कामकाज अधिक गतीने होण्यासाठी ही प्रणाली विकसित करावी, असे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
ई गव्हर्नन्स अंतर्गत क्रीडा संचालनालय स्तरावर एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्यासंदर्भात आज मंत्रालयात क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुहास पाटील, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भरणे म्हणाले की, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, क्रीडा विकासाच्या बाबींचे सुनियोजितरित्या व्यवस्थापन करण्यासाठी सुसज्य एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. अशी प्रणाली विकसित झाल्यावर खेळाडूंना योजनांचा लाभ वेळेत मिळेल. स्पर्धा व खेळाडूंच्या कामगिरीचा तपशिल एकत्रित प्रणाली अंतर्गत जतन करता येईल. विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत ई गव्हर्नन्स – प्रशासकीय व्यवस्थापनासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करावी, असे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.
मंत्री भरणे म्हणाले की, क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत क्रीडा विकास व युवा हितावह विविध योजना राबविण्यात येत आहेत. पायाभूत क्रीडा सुविधा निर्माण करणे, यशस्वी व प्रतिभावान खेळाडू घडविणे, अत्याधुनिक प्रशिक्षणाकरीता आर्थिक सहाय्य करणे, खेळाडूंना प्रोत्साहन सवलती व गौरव, शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन, वयोवृद्ध खेळाडूंना मानधन, व्यायामशाळा व क्रीडांगण विकास योजना अंतर्गत अनुदान, खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत दैनंदिन क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा गुण सवलत, खेळाडूंना शिष्यवृत्ती तसेच युवा महोत्सव, युवा कल्याण उपक्रमांना सहाय्य इ. योजनांचा समावेश आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य द्यावे.