कानपूर, दि.20 : महिला सुरक्षेबाबत संवेदनशिलतेने पाऊले उचलण्यासाठी मार्गदर्शक यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. या विषयात स्त्री आधार केंद्र संस्थेच्या माध्यमातून 1996 ते 2010 या काळात पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी स्त्री-पुरुष समानता आधारित प्रशिक्षण घेण्यात आली. सध्याही आम्ही पोलिस व महिला कार्यकर्त्यांच्या सहकार्याने काम करीत आहोत, अशा सक्रीय सहभागाशिवाय सामाजिक विकास प्रक्रिया अपूर्ण असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
कानपूर स्थित समाजसेविका नीलम चतुर्वेदी यांच्या सखी केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व अधिकाऱ्यांच्या मदतीने एकूण 80 कार्यशाळा पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विहित कार्यप्रणाली ठरविणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. बलात्कार, अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडित महिलेचा जबाब कसा घ्यायचा. अशा आपत्तीमध्ये सापडलेल्या जर कोणी मूकबधिर, कर्णबधिर, विशेष अपंग महिला असेल तर त्यांची उत्तरे कोणत्या माध्यमातून मिळवायची, पोलिसांशी कसे बोलावे, याचे प्रशिक्षण देण्यात आले. या विहित कार्यप्रणाली तयार करण्याचे काम सुमारे दहा वर्ष चालले आणि आजही सुरु आहे. पोलिसांशी संवाद आणि सहकार्याने हे काम केले जात आहे. विधान परिषदेची रचना, कायद्याची माहिती आणि सहाय्यक कार्य, कायदेशीर सहाय्य, पर्यावरणीय बदल, महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सेवा आणि महिला संस्थांचे व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. आंतरराज्य स्तरावर, महिला संस्थांचा संवाद आवश्यक आहे आणि ज्यांना महिला संस्थेच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन केले.
सखी केंद्राच्या संचालिका नीलम चतुर्वेदी यांनी समाजातील विविध व्यक्ती जसे की, दिव्यांग जेष्ठ नागरिकांनी हिंसाचार पीडित महिलांसाठी सखी केंद्र कसे काम करत आहे याची माहिती दिली. सखी केंद्राने संकेतस्थळ व मोबाईल ॲप तयार केले आहे. सर्वांनी या ॲपच्या माध्यमातून संस्थेच्या कामात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. महिला कार्यकर्त्यांनी कोविडच्या कामकाजाच्या काळात संस्थांना केलेल्या मदतीबाबत त्यांचे अनुभव कथन केले.
जेहलम जोशी यांनी पर्यावरण बदलाविषयी आपले विचार मांडले. विकासाच्या सीमेपासून कोणालाही दूर ठेवू नये यासाठी काम करत असल्याचे सांगितले. तसेच स्त्री आधार केंद्र शाश्वत विकासाच्या उद्दिष्ट बद्दल कशा पद्धतीने काम करीत आहे याबाबत भूमिका सांगितली महिला कार्यकर्त्यांना तयार करण्याचे कामही स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून केले जाते.
स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या भगिनी जेहलम जोशी सामाजिक कार्यकर्ता नीलम चतुर्वेदी, विधानपरिषदेचे उपसभापती यांचे विशेष कार्य अधिकारी सचिन चिखलकर व मोठ्या संख्येने स्थानिक महिला कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.