रिध्दपूर येथे मराठीचे पहिले विद्यापीठ देता आले याचा आनंद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी अवतरण दिन वर्षानिमित्त

 – कविवर्य सुरेश भट सभागृहात संमेलन उत्साहात साजरे

नागपूर :- भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांची जन्मभूमी ही गुजरातमध्ये तर कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी संपूर्ण भारतासह अफगाणिस्थानपर्यंत आपल्या महानुभाव पंथाचा, धर्माचा प्रसार व प्रचार केला. धर्मावरच्या चर्चा सर्वसामान्यांपर्यंत पोहचाव्यात, त्यांना धर्माचे आकलन व्हावे यासाठी त्यांनी आपल्या बोलीभाषेचा अर्थात मराठीचा आग्रह धरला. खऱ्या अर्थाने मराठीची सेवा भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामींनी केली. मी मुख्यमंत्री असतांना रिध्दपूर येथे मराठी विद्यापीठासंदर्भात निर्णयाची संधी मिळाली होती. सत्ता बदलामुळे मध्यंतरीचा कालखंड हा या विद्यापीठासाठी अनुकूल नव्हता. आम्ही पुन्हा सत्तेवर येताच स्वामींनी दिलेली ही संधी आहे असे मानून आपण मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करुन कुलगूरुंची नियुक्ती केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन वर्ष निमित्त येथील सुरेश भट सभागृहात आयोजित संमेलनात ते बोलत होते. या वेळी विध्वंस बाबा, परम पुज्यनीय कारंजेकर बाबा, कापूसतळणीकर बाबा, बिडकर बाबा, मु.धो.व्यास बाबा, आमदार परिणय फुके, कृपाल तुमाने, इतर संत-महंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या संमेलनानिमित्त उपस्थित अनेक मान्यवर महंत एका मंचावर येत असल्याने त्यांचे आशिर्वाद घेण्याची मला संधी मिळाली या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त केली. ज्या-ज्या भागात मराठी बोलल्या जाते तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र अशा सोप्या भाषेत श्री चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्राची व्याख्या केली. मराठी भाषेच्या अनुषंगाने रिध्दपूरला एक विशेष महत्व आहे. मराठीतील पहिला ग्रंथ रिध्दपूरला साकारला व तो महानुभाव पंथाने निर्माण केला अशी धारणा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा आग्रह धरतांना आपल्याकडे मराठीतील हे ग्रंथच महत्वाचे प्रमाण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जवळपास 230 कोटी रुपयांचा विकास आराखडा रिध्दपूरसाठी मी मुख्यमंत्री असतांना तयार केला होता. आपल्या आग्रहामुळे हे काम आजवर पुढे वाढवू शकलो असे त्यांनी स्पष्ट केले. वास्तविक पाहता त्याच वेळेस आपण एक समिती तयार केली होती असा उल्लेख करुन भगवान चक्रधर स्वामींचा पुन्हा आशिर्वाद मिळाल्याने सत्तेत आलो. यामुळेच समितीचा अहवाल पुन्हा समोर घेऊन अर्थमंत्री नात्याने अगोदर आर्थिक तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.

आज मराठीचे पहिले विद्यापीठ हे रिध्दपूरला स्थापन झाले असून त्याच्या कुलगूरुपदी महानुभाव पंथाच्या अभ्यासकाला नियुक्ती करता आल्याचा आनंद वेगळा असल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या टप्यातील 25 कोटीचा निधी देण्याचा निर्णय केला आहे. श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथे निधी देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. याचबरोबर इतर देवस्थानांना निधीची उपलब्धता आपण केली आहे. जवळपास 78 कोटी रुपयांचा हा निधी आहे. काटोल येथे कामाबाबत जो प्रस्ताव आलेला आहे. त्याबाबत 25 कोटीचा आराखडा आपण तयार करुन टप्याटप्याने निधी उपलब्ध करुन देऊ असे उपमुख्यमत्री फडणवीस यांनी सांगितले.

अनेक परकीय आक्रमणांच्या काळात महानुभाव पंथाने आपला धर्म टिकवून ठेवला. कुठलाही जातीपातीचा विचार न करता सर्वसमाज एक आहे अशा प्रकारचा एकात्म भाव महानुभाव पंथाने दिला आहे. यामुळे कोणताही भेदभाव इथे नाही. हा एकसंघपणा, एकात्म भाव राष्ट्रासाठी महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यामध्ये महानुभाव पंथाचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे गौरोद्गारही त्यांनी काढले.

महानुभाव पंथ व माझा गत २८ वर्षांपासून स्नेहभाव आहे. मी महापौर असताना चिचभवन येथील संमेलनात सेवेची संधी मिळाली होती. चिचभवन परिसरात महानुभाव पंथाच्या भवनाला जागा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून निर्णय घेण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

महानुभाव ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आमदार परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने यांच्यासह महंताचे समयोचित भाषणे झाली. रिध्दपूर येथील मराठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अविनाश अवलगावकर व इतर महंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजे उमाजी नाईक यांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन

Sun Sep 8 , 2024
नागपूर :- राजे उमाजी नाईक यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात आज साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी विभागीय चौकशी अधिकारी दिपाली मोतीयेळे, उपायुक्त पुरवठा अनिल बनसोड तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com