मुंबई :- पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, श्री मार्लेश्वर देवस्थान आदी क्षेत्रांना ऐतिहासिक, अध्यात्मिक, पुरातत्वीय वारसा आहे. या क्षेत्रांचा विकास करताना पुरातत्वीय महत्व, ऐतिहासिक सौंदर्य जपण्यात यावे. नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षांपूर्वीच्या मूळ वास्तूशी मिळते-जुळते असावे. तसेच इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटनक्षेत्रांचा परिपूर्ण आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या विकासकामांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी दिला.
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे, देवस्थाने आणि पर्यटनक्षेत्रांच्या विकासासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, इंदापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे संवर्धन करुन जुने बुरुज, गाव वेसेसह ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्याबरोबरच गढीलगत असणाऱ्या हजरत चाँदशाहवली बाबांच्या दर्गा परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने सादर करावा. यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात येईल. ही विकासकामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्याची खबरदारी घ्यावी. विकासकामे करताना त्या परिसराचा, वास्तूचा ऐतिहासिक, पुरातत्व महत्व जपले जावे, याची काळजी घ्यावी. गढीच्या परिसरात अतिक्रमणे असल्यास ती तातडीने हटविण्याची कारवाई करण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मिती करण्यास मोठा वाव आहे. त्याचा विचार करुनच कोकणातल्या पर्यटनस्थळांचा विकास करावा. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत चिपळूण तालुक्यातील पेढे येथील सवतसडा धबधबा, चिपळूण गुहागर बायपास रोडवरील पुरातन बौद्ध लेणी (दगोबाची लेणी) सुशोभीकरण करणे, संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवस्थान परिसर, कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, श्री टिकलेश्वर मंदिर, श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे आर्च ब्रिज बांधणे, सुशोभीकरण करणे ही कामे करण्याबाबत वास्तूविशारदांची नेमणूक करण्यात यावी. पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.
बैठकीला आमदार दत्तात्रय भरणे, आमदार शेखर निकम, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. एच. गोविंदराज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, दूरदृश्यप्रणालीद्वारे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. एस. चव्हाण, नगरपालिका इंदापूरचे मुख्याधिकारी राम कापरे, वास्तुविशारद स्मिता तावरे, रत्नागिरीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, इंदापूर येथील बाळासाहेब ढवळे, भारत जामदार, आझाद पठाण, ओमकार साळुंके आदी उपस्थित होते.