लोणावळा शहरातील विविध नागरी समस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

– लोणावळा शहरासाठी विविध ९ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

– खंडाळ्यासाठी ५ एमएलडीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला गती द्या – उपमुख्यमत्री अजित पवार यांचे निर्देश

– लोणावळा हद्दीतील भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या उर्वरित कामांच्या भूसंपादनासाठी १५ कोटी रुपयांचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

मुंबई :- पुणे जिल्ह्यातील लोणावळा, खंडाळा ही राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे असून येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्व प्रकारची मदत करण्यात येईल. या शहराच्या भविष्यातील लोकसंख्येचा, पर्यटकांचा विचार करून खंडाळा भागाकरिता ५ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प आणि लोणावळा शहरासाठी विविध ९ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची कार्यवाही गतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

लोणावळा नगरपरिषदेच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात आढावा घेतला. बैठकीस आमदार सुनील शेळके, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, डॉ. के.एच. गोविंदराज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, पुण्याचे नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागाचे संचालक अविनाश पाटील आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपुलाचे उर्वरित काम नगरपरिषद आणि रेल्वे प्राधिकरणाकडून तातडीने करण्यात यावे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून रस्ता केल्याशिवाय या उड्डाणपुलाचा उपयोग होणार नाही. त्यामुळे या कामाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनामार्फत १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाने नगरपरिषदेच्या सहाय्याने तातडीने भूसंपादन प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, लोणावळा शहरातील दीर्घकालीन भाडेतत्त्वावर (लिजवर) दिलेल्या मालमत्तांची मुदत संपली आहे. मात्र, लिजधारकांनी परस्पर मालमत्ता विकल्याचे निर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर या मालमत्तांबाबत अंबरनाथ नगरपालिकेच्या धर्तीवर दंड आकारून त्या नियमित करण्याबाबत मार्ग काढण्यात यावा. शहरातील स्थानिक रिक्षा, टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही यादृष्टीने ओला, उबर यासारख्या ऑनलाईन कॅबचालक कंपन्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात. शहरातील पथविक्रेत्यांच्या समितीमध्ये स्थानिक पथविक्रेत्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांना निमंत्रित सदस्य म्हणून घेण्यात यावे. औद्योगिक वसाहतीमधील विजेची समस्या सोडविण्यासाठी एक्प्रेस फीडर देऊन प्रश्न मार्गी लावावा. अधिसंख्य पदांची निर्मिती करुन नगरपरिषदेच्या आस्थापनेवर सफाई कामगारांच्या वारसांना वर्ग चार च्या पदांवर नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

लोणावळा शहराचा विकास आराखडा अंतिम करताना हनुमान टेकडी परिसरातील म्हाडा घरकुलांना वाढीव एफएसआय देण्याबाबत नगरविकास सचिवांनी संबंधितांची बैठक घेऊन तातडीने कार्यवाही करावी. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या लोणावळा शहरातील दोन किलोमीटर मार्गाचे नगरपरिषदेच्या निधीतून रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावास रस्ते विकास महामंडळाने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे. नगरपरिषदेला पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची ६.५ गुंठे जागा मिळण्यासाठी एकत्रित पाहणी करुन सध्याच्या टाकीलगतची जागा तातडीने देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्टला रकम थेट जमा होण्यासाठी आधार सिडींग प्राधाण्याने करा – जिल्हाधिकारी संजय दैने

Tue Aug 20 , 2024
– बँकांनी योजनेच्या रकमेतून कपात करू नये गडचिरोली :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३१ जुलै पर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार १७ ऑगस्ट रोजी लाभ वितरण करण्यात आले आहे. ई-केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रीया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!