मुंबई :- स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली असती, तर देश पाच दशके पुढे गेला असता. नैराश्याने ग्रासलेल्या आणि भारतीयांच्या क्षमतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिवाजी पार्कवरील विराट विजय संकल्प सभेत बोलताना केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ,उद्योग मंत्री उदय सामंत,शालेय शिक्षण मंत्री,दीपक केसरकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, भाजपा मुंबई अध्यक्ष,आशिष शेलार व महायुतीचे मुंबईतील सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांकरिता आयोजित प्रचार सभेत मोदी यांनी काँग्रेसी राजवटीचे अक्षरशः धिंडवडे काढले. काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांनी मुंबईची वाताहत करून मुंबईच्या विकासाला रोखून ठेवले, असेही ते म्हणाले. सत्तेसाठी नकली शिवसेनेने मुंबईला धोका दिला आणि ते वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या कुशीत जाऊन बसले, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांचाही समाचार घेतला. ज्यांनी मुंबईची वाताहत केली, मुंबईकरांना वेठीला धरले, त्यांना आता हे क्लीनचीट देत आहेत. याहून मोठा धोका कोणता असू शकतो, असा सवालही त्यांनी केला. धर्माच्या आधारावर आरक्षणास संविधान सभेचाही विरोध होता. पण इंडी आघाडीवाले धर्माच्या आधारावर आरक्षण वाटू पाहात आहे. आम्ही हे कदापि होऊ देणार नाही, असा इशारा देत मोदी म्हणाले की आता मुंबईकरांची सर्व स्वप्ने, सर्व संकल्प खंबीरपणे पूर्ण करण्याचा मोदी सरकारचा संकल्प आहे. येत्या पंचवीस वर्षांचा विकासाचा आराखडा आमच्याकडे आहे, तर इंडी आघाडीच्या काँग्रेसच्या माओवादी जाहीरनाम्यातील घोषणांची अंमलबजावणी केली, तर देशाचे दिवाळे निघेल. काँग्रेसची नजर महिलांच्या मंगळसूत्रावर आहे. मंदिरांच्या संपत्तीवर आहे, आणि वारसांच्या संपत्तीवर आहे, या आरोपांचाही मोदी यांनी पुनरुच्चार केला. काँग्रेसची माओवादी विचारसरणी देशासमोरील मोठे संकट ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.मुंबई हे स्वप्ने जगणारे शहर आहे. स्वप्ने, संकल्प घेऊन येथे येणाऱ्या कोणासही या शहराने कधीच निराश केले नाही. मी देखील विकसित भारताचे स्वप्न, संकल्प घेऊन आज येथे आलो आहे.
मुंबईला यासाठी मोठी भूमिका पार पाडायची आहे, असे सांगून मोदी म्हणाले की, जगातील अनेक देश स्वातंत्र्यानंतर आपल्यापुढे गेले, आपणच मागे पडलो, कारण या देशाच्या नेतृत्वाने कधी भारतीयांच्या सामर्थ्यावर विश्वासच ठेवला नाही. देशाचे पंतप्रधानच जेव्हा लाल किल्ल्यावरून देशवासीयांना आळशी म्हणत होते, जी सरकारेच असा विचार करतात, ते देशाला कधीच पुढे नेऊ शकत नाहीत. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्ल्यानुसार जर काँग्रेस विसर्जित केली असती, तर आज भारत किमान पाच दशके पुढे गेला असता. भारताच्या सर्व व्यवस्थांचे काँग्रेसीकरण झाल्यामुळे देशाची पन्नास वर्षे बरबाद झाली. स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारत सहाव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था होता, 2014 मध्ये काँग्रेस सत्तेवरून पायउतार झाली, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावरून अकराव्या क्रमांकावर गेली होती. गेल्या दहा वर्षांत आज देश जगातील पाचव्या क्रमांकाची आर्थिक शक्ती म्हणून उभा आहे.
आज भारतात, मुंबईत, विक्रमी गुंतवणूक येत आहे, आणि काही वर्षांतच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक शक्ती झालेला असेल, ही माझी गॅरंटी आहे. मी तुम्हाला विकसित भारत दिल्याशिवाय जाणार नाही, याकरिता दिवसाचा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आणि देशासाठी समर्पित असेल, अशी ग्वाहीदेखील मोदी यांनी दिली.नैराश्याच्या गर्तेत बुडालेल्यांच्या मनात आशा निर्माण करणे अवघड असते. निराश लोकांना कोणतीच गोष्ट शक्य वाटत नाही. राम मंदिरदेखील त्यांना अशक्य वाटत होते, केव्हातरी जगाला हे वास्तव मान्य करावेच लागेल, की भारताची जनता आपले विचार, निर्धार आणि संकल्पावर एवढे ठाम होते, की एका स्वप्नासाठी त्यांनी पाचशे वर्षे अविरत संघर्ष केला आहे. पाचशे वर्षे उराशी बाळगलेले राम मंदिराचे स्वप्न आज साकार झाले आहे. याच नैराश्यग्रस्तांना कलम 370 रद्द करणेही अशक्य वाटत होते, पण आता या अडथळ्यास आम्ही कब्रस्तानात गाडले आहे. आता ते पुन्हा प्रस्थापित करण्याची हिंमत जगातील कोणतीही शक्तीकडे नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 40 वर्षे महिला 33 टक्के आरक्षणाची प्रतीक्षा करत होत्या. आज संविधानाच्या नावाने ओरड करणाऱ्यांनी संसदेतील आरक्षण विधेयक फाडून फेकले होते. त्यांच्या छाताडावर बसून आरक्षण दिले. सातत्याने गरीबीच्या नावाने जपमाळ करणाऱ्यांनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली होती.
गरीबांना गरीबीतून बाहेर काढणे त्यांना अशक्य वाटत होते. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने 25 कोटी जनतेला गरीबीतून बाहेर काढले. जे त्यांना अशक्य वाटत होते, ते आम्ही करून दाखविले. ही मोदींची नव्हे, तुमच्या मताची ताकद आहे, असे ते म्हणाले. आपल्या पुढच्या पिढीचे उज्जवल भविष्य, सुरक्षितता, विकास, भारताची जागतिक प्रतिष्ठा, यासाठी घराबाहेर पडा आणि आपल्या मताचा वापर करून देशाच्या विकासाची वाटचाल मजबूत करा, असे आवाहन त्यांनी केले. ज्यांनी जनादेश धुडकावून सरकार बनविले, त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाशी शत्रुत्व पत्करले, त्यांनी मुंबईवर सूड उगवला. तिचा हक्क पुन्हा देण्यासाठी मोदी कटिबद्ध आहेत, अशी ग्वाही देत त्यांनी मुंबईतील विकास प्रकल्पांची यादीच सादर केली. एनडीए आघाडीने गेल्या दहा वर्षांत सव्वा लाखाहून अधिक नवे स्टार्ट अप बनविले. आठ हजाराहून अधिक स्टार्टअप एकट्या मुंबईत आहेत. गेल्या दहा वर्षांत भारत मोबाईल निर्मितीत जगातील दुसरा सर्वात मोठा देश ठरला आहे. टेक्नॉलॉजी ते टेक्स्टाईल आणि प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी येत्या काळात निर्माण होतील, तेव्हा त्याचा सर्वात मोठा फायदा मुंबईला, मुंबईच्या युवकांना होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आता मराठीतही मेडिकल आणि इंजिनीयरिंगचे अभ्यासक्रम सुरू होतील, असे त्यांनी सांगितले, तेव्हा श्रोत्यांनी टाळयांचा कडकडाट करून त्याचे स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपल्या भाषणात मविआ आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. लांगूलचालनाच्या राजकारणापायी उद्धव ठाकरे यांना आता हिंदू शब्द उच्चारण्याचीही लाज वाटते, असे फडणवीस म्हणाले. आता त्यांच्या सभांमधून पाकिस्तानचे झेंडे फडकतात, टिपू सुलतानाचा जयजयकार होतो, असा आरोप फडणवीस यांनी केला.बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेणाऱ्या काँग्रेसचा प्रचार उबाठा करत आहेत, म्हणून बाळासाहेबांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकारही त्यांना नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वसमावेशक सक्षम नेतृत्व मिळाले असून हे नेतृत्वच आपल्याला व देशाला प्रगतीच्या शिखरावर नेणार आहे. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा राहिला नसल्याने ते असंबद्ध शब्द वापरत केविलवाणी भाषणे करून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत आहेत असा आरोप अजितदादा पवार यांनी केला. संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.राज ठाकरे यांनी सुरुवातीलाच मविआचा एकाच वाक्यात समाचार घेतला. जे सत्तेतच येणार नाहीत, त्यांच्याबद्दल कशाला बोलायचे, असे ते म्हणाले. मोदीजी होते म्हणून राम मंदिर झाले. मोदीजी होते म्हणून 370 कलम रद्द झाले. मोदीजी होते म्हणून तिहेरी तलाक पद्धती रद्द होऊन शाहबानोला न्याय मिळाला. इतकी वर्षे जे झाले नाही, ते करून घेणे सर्वात महत्वाचे, म्हणून मी मोदीसोबत आहे. पुढच्या पाच वर्षाकरिता आमच्या आपल्याकडून अनेक अपेक्षा आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, देशाच्या अभ्यासक्रमात सव्वाशे वर्षांच्या मराठा साम्राज्याचा इतिहास समाविष्ट करावा, शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांना पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी, देशात अनेक ठिकाणी उत्तम रस्ते आहेत, गेल्या 18-19 वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा, संविधानाला धक्का लागणार असा प्रचार करणाऱ्यांना एकदाच खणखणीत उत्तर देऊन त्यांची तोंडे बंद करा, अशा अपेक्षा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या. मुंबईच्या लाखो रेल्वे प्रवाशांच्या सुविधा अधिक चांगल्या होतील, याकडे लक्ष द्या, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.