संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- रब्बी हंगाम आटोपताच शेतकरी खरीप हंगामाचे नियोजन करून पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेत आहेत. 25 मे पासून सुरू झालेल्या रोहिणी नक्षत्राच्या समाप्ती नंतर आज 8 जून पासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली यावर्षी काही प्रमाणात रोहिणी नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यानी नवतपाच्या उष्णतेच्या झळा सोसून मशागतीची कामे पूर्ण केली.शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज असून मृगधारा बरसण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
सिंचनाची सोय असलेल्या बहुतांश शेतकऱयांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली होती.पावसाळा प्रारंभ होण्या अगोदर रब्बी हंगाम आटोक्यात आणण्याचा शेतकऱ्यांनी पुरेपूर प्रयत्न केला.ज्या शेतकऱ्याकडे रब्बी पिकाची लागवड केली गेली नव्हती अशा शेतकऱ्यांनी या अगोदरच मशागतीची कामे उरकून घेतली होतो सध्यातरी रब्बी हंगाम शेवटच्या टप्प्यात असून खरिपाचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे.कोणत्या पिकाची लागवड करावी ,याचे नियोजन करून शेतकरी बी बियाण्यांची जुळवाजुळव करीत आहे.यावर्षी रोहिणी नक्षत्रात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीची कामे उरकून घेण्यास मोठी मदत मिळाली.काळ्या आईच्या सेवेत बळीराजा सज्ज झाला असून नव्या दमाने खरिपातील पेरणीसाठी सज्ज झाल्याचे दिसुन येत आहे.मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरण व निसर्ग बदलामुळे यावर्षी समाधानकारक पाऊस होण्याच्या अपेक्षेत शेतकरी दिसून येत आहे.
@ फाईल फोटो