‘ई-ऑफिस’ प्रणालीमुळे आयुक्तालयातील 600 फाईल्सचा निपटारा – विजयालक्ष्मी बिदरी

Ø काजकाजात आली सुसूत्रता, जलद निर्णय प्रक्रिया

Ø वर्धा, भंडारा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी

Ø तहसिलमध्ये ई-ऑफिस राबविणारा वर्धा जिल्हा प्रथम

नागपूर :- एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापनांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयातील दैनंदिन प्रशासकीय कामे ‘महा-ई ऑफिस’ प्रणालीच्या वापरामुळे सुलभ व गतिमान झाली आहेत. या प्रणाली अंतर्गत आतापर्यंत 600 पेक्षा अधिक प्रकरणांवर निर्णय घेण्यात आले. ही प्रणाली संपूर्ण विभागात प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.

ई-ऑफिस प्रणाली राज्यात प्राधान्याने नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयापासून ई-ऑफिस प्रणालीचा गतवर्षीच्या स्वातंत्र्य दिनापासून सुरुवात झाली आहे. शासकीय कामात संगणकाचा अधिकाधिक वापर करुन कामकाज गतिमान व्हावे, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्ताऐवज सुरक्षित राहावे तसेच माहिती जलद गतीने प्राप्त होऊन निर्णय प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी ई-ऑफिस प्रणाली परिणामकारकपणे राबविण्यात आली आहे.

या प्रणालींतर्गत पहिल्या टप्प्यात विभागीय आयुक्त कार्यालयापासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध प्रशासकीय व इतर कामासंदर्भातील फाईल्स पाठविण्याला व त्यावर निर्णयासाठी सात ते दहा दिवसापेक्षा जास्त वेळ लागत होता. या प्रणालीमुळे एक ते दोन दिवसातच या फाईलिंवर निर्णय घेणे शक्य झाले आहे. त्यामुळे कामकाजामध्ये गतिमानता येऊन पेपरलेस ऑफिसच्या दृष्टीने प्रशासनात हे एक महत्वाचे पाऊल ठरल्याचे बिदरी यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हास्तरीय महसूल व इतर विभागांकडून ई-ऑफिस प्रणालीव्दारे फाईलचा प्रवास सुरु झाला. यामध्ये 1 हजार 911 फाईल्सची नोंद झाली आहे. आयुक्त कार्यालयातील महसूल, पुरवठा, नियोजन, रोजगार हमी योजना, पुनर्वसन, नगरपालिका प्रशासन, आस्थापना शाखा, विकास शाखा आदी विभागांकडून ई-ऑफिस प्रणाली राबविण्यास सुरुवात झाली आहे.

जिल्हा स्तरावर ‘ई-ऑफिस’ ची अंमलबजावणी

वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालय तसेच तहसिल कार्यालयांमध्ये ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरु झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यत 54 हजार 170 फाईल्स या प्रणालीव्दारे हाताळण्यात आल्या असून 42 हजार 176 डाक व टपाल प्रकरणांचा यामध्ये समावेश आहे. महसूल विभागात संपूर्ण ई-ऑफिस प्रणाली सुरु करणारा वर्धा जिल्हा राज्यात पहिला ठरला आहे अशी माहिती, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्मिक प्रकल्प व्यवस्थापन कक्षांतर्गत ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरु झाला असून तालुका स्तरावरही या प्रणालीचा वापर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी सर्व विभागांमध्ये नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. जिल्ह्यात यावर्षी 8 मार्च पासून ई-ऑफिस प्रणालीला सुरुवात झाली असल्याची माहिती, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली.

ई-ऑफिस प्रणालींतर्गत विभागातील नागपूर जिल्ह्यात 632, गोंदिया जिल्ह्यात 60, गडिचिरोली जिल्ह्यात 46, भंडारा जिल्ह्यात 87 तर चंद्रपूर जिल्ह्यात 242 फाईल्सचा निपटारा करण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अमृत योजनेच्या प्रगतीने शहरातील अनेक भाग टँकर मुक्त,उन्हाळ्यातील पाणी टँकरची संख्या १२ वरून ४ वर

Thu Jun 8 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पूर्णतः नविन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे.योजनेचे बरेच काम पूर्ण झाले असुन त्यामुळे शहरातील बराच भाग हा टँकरमुक्त झाला आहे. उन्हाळ्यात शहरातील राष्ट्रवादी नगर,आंबेडकर नगर, तुकूम, आंबेडकर भवन परिसर,हवेली गार्डन इत्यादी भागात पाणी टंचाई जाणवायची त्यामुळे टँकरने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com