घातक वायू प्रदूषण !

एका अभ्यासानुसार, आजघडीला दक्षिण आशियातील प्रत्येक दहापैकी नऊ शहर प्रदूषण ग्रस्त, प्रामुख्याने वायू प्रदूषणाने त्रस्त आहेत. त्याच्या मानवी आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा विचार करता जागतिक आरोग्य संघटनेने देखील या प्रदूषणाची दखल घेतली आहे. जागतिक पातळीवर ओरड सुरू झाल्यावर या क्षेत्रातील बव्हतांश देशांनी एअर क्वालिटी मॅनेजमेंट नावाचा एक कार्यक्रम हाती घेतला खरा, पण तो राबविण्यासंदर्भात अद्याप गांभीर्याचा अभाव असल्याने, या कार्यक्रमाचे हवे तसे परिणाम बघायला मिळत नाहीयेत.

सर्वत्र होणाऱ्या वायू प्रदूषणास विविध घटक कारणीभूत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. वायु प्रदूषणास कारणीभूत असलेल्या जगभरातील समान कारणे व घटकाव्यतीरिक्त दक्षिण आशिया क्षेत्रात हवेत PM2.5 उत्सर्जित करणाऱ्या काही विशेष, स्थानिक मानवी कृतींचीही नोंद अतिशय गंभीर ठरते आहे. विविध देशांमध्ये होणारे आणि त्या देशाच्या सीमेतच परिणाम मर्यादीत राहिलेले प्रदूषण, देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून परिणाम घडवून आणणारे प्रदूषण, अशा विविध दृष्टीकोनातून या विषयाचा अभ्यास झाला, तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील यासंदर्भातील उपाय योजनांची आवश्यकता अधोरेखित झाली. संबंधित सर्वच देशांनी अतिशय जबाबदारीने या संदर्भात कार्यवाही केली, उपाय योजले तर पुढील काही वर्षांत, हवेतील विषारी घटकांचे प्रमाण निदान चाळीत टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे. पण त्यासाठीही आपापल्या जीडीपीचा किमान ०.११ टक्के भाग विविध देशांना या कामी मोजावा लागेल.

तसं पाहिलं तर सर्वच प्रकारच्या प्रदूषणाचे परिणाम घातकच आहेत. पण त्यातल्या त्यात हवेचा संबंध सर्व जिवीत घटकाच्या श्वसन प्रक्रियेशी येत असल्याने वायू प्रदूषणाचा मुद्दा प्रथम प्राधान्य श्रेणीत मोडतो. श्वास घेण्यास त्रास हो, काही गंभीर आजार, काही विकृती, जीवन कालावधी कमी होणे असे काही परिणाम हवेच्या प्रदूषणामुळे बघायला मिळताहेत. हे प्रदूषण कमी करण्याचे उपाय अमलात आल्यास वर्षाकाठी किमान साडे सात लाख (जीव वाचवता येतील. जागतिक आरोग्य संघटनेला यासाठी प्रती माणशी ७६०० अमेरिकन डॉलर एवढा खर्च अपेक्षित आहे. हा आकडा देशनिहाय, स्थानिक परिस्थितीनुसार बदलणार असला तरी, जगातील कोणीही यातून सुटत नाही, हे वास्तव आहे आणि ते अतिशय भीषण आहे.

पाणी, वायु, वातावरणात विषारी, घातक घटक मिसळले जातात तेव्हा ते प्रदूषित होतात आणि ते घटक मानवासहीत अन्य सजीवांच्या शरीरात जाणे सुरू झाले की त्याचे दुष्परिणाम एकूणच सजीव घटकांच्या प्रकृतीवर होतात. ज्वालामुखीसारख्या नैसर्गिक घटनांमुळे होणारे प्रदूषण मानवी नियंत्रणापलीकडचे आहे. पण इथे तर मानवनिर्मित प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण त्याही पलीकडचे ठरताहे. हवा आणि पाणी प्रवाहीत होत असल्याने ते प्रदूषित एका ठिकाणी झाले असले तरी त्याचे परिणाम इतरत्र स्थित जीवांनाही भोगावे लागतात. एका समुद्रातून दुसन्या समुद्रात अथवा नद्यांमधून समुद्रात स्थलांतरीत होणारे मासे हे प्रदूषण सोबत घेऊन जातात. न्युक्लिअर रिअॅक्टर मधून बाहेर पडणारे रेडिओ अॅक्टीव्ह घटक हवेच्या सहाय्याने सहज एका ठिकाणाहून अन्य ठिकाणी स्थलातरीत होऊ शकतात. विविध कारखान्याच्या चिमण्यांमधून बाहेर पडणारा धूर तर देशाच्या सीमा ओलांडून दूरवर परिणाम करू शकतो…..

वाहनांच्या पाईप मधून बाहेर पडणारा काळा धूर निदान दिसतो तरी. पण हवेत तर नजरेस न दिसणारे कितीतरी घटक असतात. डोळ्यांची जळजळ, श्वसनास त्रास होणे, लग्ज कॅन्सरचा धोका असे सारे घडवून आणण्याची ताकद त्या प्रदूषणात असते. ज्वालामुखीसारख्या घटनेत बाहेर पडणारा धूर वापू, राख सारेच घातक असतात. १८८३ मधे इंडोनेशियातील काराकाटोआ येथील व्होल्कॅनिक इरप्शनचे परिणाम सभोवतालच्या सर्वच देशांनी भोगले. घटनेनंतर कितीतरी दिवस निरभ्र आकाश बघायला मिळाले नव्हते. सर्वदूर अंधार दाटल्यागत चित्र होते. हे खरे आहे की, यातील काहीच माणसाच्या हाती नव्हते, ना घटना, ना त्याचे परिणाम! पण भोपाळ गॅस अपघात मात्र पूर्णपणे मानवी चुकांचा परिपाक होता….

जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे. उपाय योजण्याचे उद्दिष्ट युनोने निर्धारीत करून दिले आहेत. जगातील सर्वच देशांसाठी २०३० पर्यंतचे अंतरिम आणि २०५० पर्यंतचे अंतिम उद्दिष्ट देखील ठरवून देण्यात आले आहे. प्रत्यक्ष कृती आणि त्याचे फलित मात्र अद्याप नजरेच्या टप्यात नाहीय…..

डॉ. प्रवीण महाजन

जल अभ्यासक,

डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण पुरस्कार्थी (महाराष्ट्र शासन) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणवूपा नदीला राज्यस्तरीय समिती सदस्य.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा जैन प्रकोष्ठच्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ

Tue Aug 22 , 2023
मुंबई :-भारतीय जनता पार्टी प्रदेश जैन प्रकोष्ठच्या कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी करण्यात आला. जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष ललित गांधी, जैन प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक संदीप भंडारी, विकास अच्छा हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे अभियान कौतुकास्पद असून जैन प्रकोष्ठच्या अभियानामागे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!