– सहपोलिस आयुक्तांनी केले चिमुकलीच्या कलाकृतीचे कौतुक
– बक्षीस देताना सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे
नागपूर :-बालके निरागस असतात. या वयात काय चांगले, काय वाईट, हे कळत नाही. काय स्वीकारले पाहिजे आणि काय नाकारले पाहिजे, याबद्दलही समजत नाही. स्मार्ट मोबाईलचे चांगले तसेच वाईटही परिणाम आहेत. बालकांचा मोबाईलकडे कल जास्त असतो. परंतु स्मार्ट मोबाईलमुळे वाचनाकडे दुर्लक्ष होते. बौद्धिक क्षमता आणि विचार करण्याची शक्ती खुंटल्यासारखी होते. बालकांना समजत नसले तरी सुज्ञ पालक म्हणून तुम्ही मुलांची प्रत्येक हौस पूर्ण करताना मात्र स्मार्ट मोबाईल देऊ नका, असे आवाहन सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे यांनी केले. पोलिस आयुक्त कार्यालयात त्यांनी पाचव्या वर्गात शिकणार्या तेजस्वी भोयर हिच्या कलाकृतीचे कौतुक केले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. माझ्या मुलाला मी वयाच्या 18 व्या वर्षी स्मार्ट मोबाईल दिल्याचे त्या म्हणाल्या.
सेंट जोसेफ शाळेतील पाचव्या वर्गाची विद्यार्थिनी तेजस्वी भोयर (वय 10) ही अभ्यासात हुशार आहे. याव्यतिरिक्त तिला ड्रॉईंग आणि पेंटिंगची खूप आवड आहे. तिने आई-वडिलांकडे जिद्द केली. ड्रॉईंगसाठी तिने महागडे रंग, साहित्य, पुस्तके घेऊन मागितली. फावल्या वेळात ती ड्रॉईंग काढते. तिने एकापेक्षा एक सुंदर आणि हुबेहुब चित्रे काढली आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुणाचेही मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण तिने घेतलेले नाही. केवळ कल्पना शक्ती आणि कधीकधी स्मार्ट मोबाईलचा आधार घेऊन ती कलाकृती शिकली. आतापर्यंत तिने आठ वह्यांमध्ये ड्रॉईंग आणि पेंटिंग काढले आहेत. यात जापनीज अॅनिमी, कार्टुन, ड्रॅगन, आकाश गंगा, फुलपाखरू, वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे, डोळे आदी चित्रे तिने रेखाटली आहेत. अश्वती दोरजे यांनी संपूर्ण चित्रे पाहून तेजस्वीचे भरभरून कौतुक केले. बक्षीस देऊन तिला प्रोत्साहित केले. अभ्यासासोबतच मुलांनी छंद जोपासावा. यासाठी पालकांची भूमिका महत्त्वाची आहे, असा सल्ला त्यांनी दिला. शिवाय मुलांना स्मार्ट मोबाईल न देण्याचा सल्लाही त्यांनी पालकांना दिला. आवश्यकता असल्यासच साधे मोबाईल द्या, असेही त्या म्हणाल्या.