यवतमाळ :- मागील वर्षी जुलै, ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. अतिवृष्टीच्या केलेल्या पंचनाम्यानुसार विमान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात आले होते. या विरोधात कंपनीने अपील दाखल केले होते. अपिलात पंचनाम्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या निकषाप्रमाणे भरपाई मिळणार आहे.
सन 2023-24 मध्ये जिल्ह्यात पिक विमा न मिळाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय पिक विमा तक्रार समिती यांनी विमा पर्यवेक्षकांनी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान 50 टक्के पेक्षा कमी दर्शविली आहे, त्या शेतकऱ्यांना जुलै व ऑगष्ट 2023 मध्ये अतिवृष्टीच्या केलेल्या पंचनाम्यानुसार विमा भरपाई देण्यात यावी, असे आदेश रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांचा हाच आदेश विभागीय आयुक्त यांनी कायम ठेवला होता. त्यानंतर कंपनीने राज्यस्तरावर अपील दाखल केले होते. त्याची सुनावणी दि.4 जुलै रोजी कृषि विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे पार पडली. या अपीलामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश कायम ठेवण्यात आला असून महसूल मंडळनिहाय ज्या शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशा प्रलंबित राहिलेल्या शेतकऱ्यांची पिकविम्याची रक्कम तातडीने देण्याविषयी रिलायन्स कंपनीला आदेश देण्यात आले आहे.
सभेकरीता आ.संजीव रेड्डी बोदकुरवार, कृषि आयुक्तालय पुणेचे कृषि संचालक विनयकुमार आवटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, शेतकरी प्रतिनिधी निमंत्रक जगदीश चव्हाण व प्रविण मोगरे तसेच रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते, असे प्रमोद लहाळे यांनी कळविले आहे.