नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक कार्यक्रम जाहीर; 30 जानेवारीला मतदान तर 2 फेब्रुवारीला निकाल

नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. येत्या ३० जानेवारीला मतदान होणार असून २ फेब्रुवारी ला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच नागपूर विभागाच्या सर्व सहा जिल्ह्यांमध्ये आदर्श आचार संहिता लागू झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी आज दिली.

राज्य निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले . नागपूर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,अपर जिल्हाधिकारी आशा पठाण आणि उपायुक्त प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते.

असा आहे निवडणूक कार्यक्रम   

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी ५ जानेवारीला अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १२ जानेवारी असून १३ जानेवारीला अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारांना १६ जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. ४ फेब्रुवारी पर्यंत निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया संपणार आहे.

नागपूर विभागात ४ हजार ३९७ मतदारांची वाढ

नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यांमध्ये १० ऑक्टोबर ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत शिक्षक मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. २०१७ च्या तुलनेत मतदारांची संख्या ४ हजार ३९७ एवढी वाढल्याचे प्रसन्ना बिदरी यांनी सांगितले. २०१७ मध्ये नागपूर विभागातील शिक्षक मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या ३५ हजार ९ होती तर २०२२ अखेर ही संख्या वाढून ३९ हजार ४०६ झाली आहे. यात २२ हजार ७०४ पुरुष तर १६ हजार ७०२ महिला मतदारांचा समावेश आहे.

आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश

विभागीय आयुक्तांनी सर्व सहा जिल्हाधिकाऱ्यांना आपआपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षक मतदार संघासाठीच्या निवडणुकीसाठी आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आदर्श आचार संहिता कक्ष उभारण्यात येणार आहे.

नागपूर विभागात २०१६ मध्ये शिक्षक मतदार संघाचे एकूण १२४ मतदान केंद्र होते. नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या मतदान केंद्रांमधील वाढ किंवा घट याविषयी संबंधित जिल्हाधिकारी ३१ डिसेंबर २०२२ रोजी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर करतील असे प्रसन्ना बिदरी यांनी सांगितले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com