– ४ पथकांच्या माध्यमातून होणार कारवाई
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील उघड्यावर मांस विक्री करणार्यांवर कारवाई केली जाणार असुन त्यांचे साहीत्य जप्त करण्याबरोबर गुन्हे सुद्धा दाखल केले जाणार आहेत. याकरीता मनपातर्फे झोननिहाय अतिक्रमण निर्मूलन पथके गठीत करण्यात आली असुन शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
शहरात उघड्यावर मांस विक्री होत असल्याने दुर्गंधी निर्माण होते व धुळ,माश्या बसुन नागरिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होऊ शकतो.मांसविक्री केल्यानंतर घाण तेथेच टाकली जाते. यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढतो. त्यामुळे आता शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असुन त्यांचे साहित्य जप्त करण्यासोबतच गुन्हे सुद्धा दाखल केले जाणार आहेत.रस्त्यावर भाजी, फळेविक्रेते सुद्धा अनेक ठिकाणी अतिक्रमण करून वाहतुकीला बाधा निर्माण करतात त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
मागील अनेक दिवसांपासुन मनपातर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सातत्याने राबविली जात असुन फुटपाथवर केलेली पक्की बांधकामे,दुकानांसमोरील असलेले रॅम्प,कच्चे – पक्के शेड,नाल्यांवरील अतिक्रमण तोडुन नाले, फुटपाथ,रस्ते मोकळे करण्यात येत आहे. याकरीता ४ अतिक्रमण निर्मूलन पथके गठीत करण्यात आली असुन सहायक आयुक्तांच्या माध्यमातुन झोननिहाय कारवाई केली जात आहे.