निवासी शाळा मुख्याध्यापक, गृहपाल यांची कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना
नागपूर : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळांना आदर्श शाळा बनविण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज दिल्या. सामाजिक न्याय भवन येथे आयोजित निवासी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व गृहपाल यांच्या नागपूर विभागस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, विभागातील सर्व सहायक आयुक्त यावेळी उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील, तसेच निवासी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देवून त्यांच्या कौशल्यांचा, व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, क्रीडाविषयक मार्गदर्शन करण्यासाठी निवासी शाळा, वसतिगृहांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच यासाठी आवश्यक सुविधांसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहायक आयुक्तांनी प्रयत्न करावेत, असे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
विभागात चांगले उपक्रम राबविणाऱ्या शाळांना इतर शाळांच्या मुख्याध्यापकांनी भेटी देवून आपल्या शाळांमध्ये सुद्धा असे उपक्रम राबवावेत. तसेच प्रत्येक विषयातील तज्ज्ञ शिक्षकांचे ऑनलाईन वर्ग आयोजित करून सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.
महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कार्यशाळेचे उद्घाटन झाले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. नारनवरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री धारवाल यांनी केले.