नागपूर : मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकमध्ये पाण्याच्या टाक्या आणि इतर कामे करणाऱ्या ठेकेदाराने (Contractor) या सर्व महापालिकांची दिशाभूल केल्याचे उघडकीस आले असून, या ठेकेदाराकडील कामांची चौकशी करण्यात येणार आहे.
कंत्राट मिळविण्यासाठी पात्र नसतानाही खोटी कादगपत्रे जोडणे, कामे वेळेत पूर्ण न करणे, कामाचा दर्जा न राखणे आणि मुदतीत कामे न केल्याचे अहवालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडण्यात आले आहेत. या कामांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती काम करणार आहे. गंभीर बाब म्हणजे, राज्याच्या पाणीपुरवठा खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला हाताशी धरून या ठेकेदाराने काही कामे घेतली आहेत, तीही रोखण्यात येणार आहेत.
या ठेकेदाराच्या कामाचा अहवाल अधिवेशनात मांडला जाणार असून, त्याबाबत चार आमदारांनी तक्रारी मांडल्या आहेत. या ठेकेदाराला कामे न देण्याची भूमिका एका समितीने घेतली आहे. मुंबई महापालिकेत जादा कामे केल्याचा दावा करीत, या ठेकेदाराने बिलांची मागणी केली आहे. त्यावर नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल राज्य सरकारने मागविला असून, त्यात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महापालिका प्रशासनाला सूचना केल्या आहेत. पाण्याच्या योजनांतून पाण्यासारखा पैसा उपसलेल्या या ठेकेदाराला धडा शिकविण्याची तयारी केली जात आहे.
मुंबई, पुणे, ठाणे नाशिकमध्ये या ठेकेदाराची कामे आहेत. विशेषतः पाण्याच्या टाक्या उभारणीचे काम असून, त्यासंदर्भातील अन्य यंत्रणांतही ठेकेदाराचा समावेश आहे. परंतु, एका राजकीय नेत्याचे नाव सांगून या ठेकेदाराने कामे घेतली आहेत. काम मिळाल्यानंतर त्यात दिरंगाई करण्यापासून निकृष्ट दर्जाची कामे करणे, कागदोपत्री वाढीव कामे पुढे करून त्याची बिले जोडण्यात हा ठेकेदार माहीर आहे. अशा अनेक तक्रारी त्यांच्याविरोधात आहेत. परंतु, कागदोपत्री ‘बनवाबनवी’ करणाऱ्या या ठेकेदाराची कुंडली काही अधिकाऱ्यांनी जमा केली आहे. त्यानुसार जिथे कुठे कामे सुरू आहेत, त्याचा कालावधी, दर्जा आणि बिले याची माहिती गोळा करण्यात येत आहे.
याआधी ठेकेदाराने खोटी कागदपत्रे जोडल्याने एका विभागीय समितीने अपात्र ठरवले आहे. तरीही, राजकीय वजन वापरून ठेकेदाराने काही अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याची दोन उदाहरणे उघडकीस आली आहेत. या सगळ्या बाबींचा एकत्रित अहवाल मुख्यमंत्री, त्या-त्या ठिकाणचे पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठण्यात येणार आहे.